मूर्तीचा शाडू कोल्हापुरात येतो कसा वाचा.. 

अमोल सावंत
मंगळवार, 7 जुलै 2020

शाडूची गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रमाण कमी असते. काही लोक अजूनही शाडूची गणेश मूर्ती वापरतात. ही शाडू कोकण, कर्नाटक, गुजरात इथून आणली जाते. पूर्वी पन्हाळा, जोतिबा, आजरा, चंदगड येथे शाडू मिळत असे. आता येथेही शाडू मिळत नाही.

कोल्हापूर : गणपतीची मूर्ती तयार करताना शाडूचा वापर केला जातो; मात्र शाडू नेमका येते कोठून? हे माहिती नसते. गणेश चतुर्थी आली की, शाडूच्या गणेश मूर्ती तयार करा, असा आग्रह कुंभारांकडे करतो. शाडूचे प्रमाण कमी होत असल्यामुळे पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) हा पर्याय पुढे आला.

शाडूची गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रमाण कमी असते. काही लोक अजूनही शाडूची गणेश मूर्ती वापरतात. ही शाडू कोकण, कर्नाटक, गुजरात इथून आणली जाते. पूर्वी पन्हाळा, जोतिबा, आजरा, चंदगड येथे शाडू मिळत असे. आता येथेही शाडू मिळत नाही. ग्रामीण भागात पूर्वी शाडूने भिंती सारवत. शिवाय शाडूच्या खाणी बुजून गेल्या आहेत. शाडू वाटेल तशी मिळणार नाही; कारण ही शाडू एक किंवा दोन वर्षात होत नाही; तर यासाठी हजारो वर्षांचा कालखंड लागतो. 

गणेश मूर्तीसाठी लांजा, शेणगाव (गारगोटी), कुन्नूर (कर्नाटक), बॉम्बे शाडू (गुजरात) इथून शाडू आणतो. यात सर्वाधिक शाडू लांजा (कोकण) येथून आणला जातो. गणपतीचे मॉडेल तयार करण्यासाठी बॉम्बे शाडूचा वापर जास्त होतो. 150 ते पावणेदोनशे टन शाडू दरवर्षी लागतो. आता गणेश मूर्तीत 70 टक्के पीओपी अन्‌ 30 टक्के शाडू असते.'' 
- विजय पुरेकर, उपाध्यक्ष शहर कुंभार माल उत्पादक सोसायटी. 

""जिथे सर्वाधिक प्रमाणात पाऊस पडतो, तिथे शाडूची निर्मिती होते. पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण सोडला तर शुष्क प्रदेशात शाडू मिळत नाही. शाडूसाठी पाऊस, हवामान, तापमान आदी घटक एकत्रितपणे यावे लागतात. कोकण, दक्षिण महाराष्ट्रात शाडूच्या खाणी आहेत; मात्र या खाणीत फार शाडू मिळत नाही.'' 
- प्रा. डॉ. उल्हास भागवत, भूगर्भशास्त्रज्ञ 

शाडू अशी तयार होते 
जास्त पाऊस, दमट हवा, आर्द्रता सर्वाधिक असल्याने कोकणात शाडू अधिक आढळते. बेसॉल्ट खडकात रासायनिक प्रक्रिया होऊन शाडू तयार होते. यात लॅटेराईट, बॉक्‍साईट, हायड्रस ऍल्युमिनियम, फेरोसिलिकेट (ऍल्युमिनियम ऑक्‍साईड), केओलीन खनिज, पाणी आदी घटक एकत्रित येऊन शाडू तयार होते. शाडूचे जमिनीत थर तयार होतात. पायरीप्रमाणे थर असतात. शाडू तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा काळ लागतो. किनारी प्रदेशात अधिक शाडू आढळते. सह्याद्रीच्या पश्‍चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसॉल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या नियमित मृदेपेक्षा वेगळा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read how the shadow of the idol comes to Kolhapur ..