कोल्हापूरच्या ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या पन्हाळा आणि पावनगड पाहता येतो 'या' वास्तुतून

उदय गायकवाड
Tuesday, 29 December 2020

या दालनाच्या पश्‍चिम बाजूच्या भव्य अशा विटांच्या कमानी आणि खांब यांनी भव्य व्हरांड्यात जाता येते.

कोल्हापूर:  कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रमणमळा तलावाच्या काठावर कोल्हापूर रेसिडेंटचा बंगला म्हणजे सध्याचे जिल्हाधिकारी निवासस्थान आहे. तत्कालिन प्रशासनाचा प्रमुख राहात असलेला बंगला आजही प्रशासन प्रमुखाच्या वापरात असल्याने ते वारसा स्थळ जपले गेले. निवासस्थान असले तरी त्या इमारतीचा एक दबदबा आणि रुबाब कायम आहे.
 

१८४५ ते १८४८ च्या दरम्यान या वास्तूची उभारणी करण्यात आली. तिथे राहणाऱ्या रेसिडेंटच्या सूचनेप्रमाणे त्यात बदल करण्यात आले. १८४८ पर्यंत बांधकामासाठी त्यावेळी एक लाख रुपये खर्च आला होता. दगड आणि विटांच्या दुमजली बांधकामाच्या वास्तूच्या उत्तरेला भव्य कमानीचा मंडप आहे. त्यातून प्रवेश केल्यानंतर प्रशस्त व्हरांडा ओलांडला की, मोठ्या दरवाजातून मोठ्या दालनात जाता येते.

या दालनाच्या पश्‍चिम बाजूच्या भव्य अशा विटांच्या कमानी आणि खांब यांनी भव्य व्हरांड्यात जाता येते. त्याला जोडून सभोवती लॉन असलेले गार्डन आहे. इमारतीच्या मध्यावरती दालनातून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना, सभोवती आणि वर इतर दालने असून जास्तीत जास्त भाग हा लाकडी खांब आणि पृष्ठाचा बनवण्यात आला होता. मोठ्या खिडक्‍या, दरवाजे, पडदे, फर्निचर, फायर प्लेस या बाबतीत इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव इथे जाणवतो. 

वरच्या मजल्यावरील दालनातून प्रवेश कमानीच्या गच्चीचा व वेलीनी सजलेल्या व्हरांड्याचा वापर निसर्गसौंदर्य आणि वृक्षांनी व्यापलेल्या परिसराला अनुभवण्यासाठी फारच छान होतो.
या इमारतीमधून पश्‍चिमेकडे अतिशय सुंदर नजारा पाहायला मिळत होता. कोल्हापूरच्या ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या पन्हाळा आणि पावनगडाचे दृश्‍य इथे बसून पाहायला मिळत होते. दक्षिण बाजूला अतिशय सुंदर तलाव आणि त्याभोवती वड, बांबूच्या झाडांच्या गर्दीनं एकांत साठवून ठेवल्यासारखी वाटणारी होती. या इमारतीच्या सभोवती चार, पाच तितक्‍याच महत्त्वाच्या व्यक्तींचे व इतरांचे बंगले असा समूह हा रेसिडेन्सीचा परिसर म्हणून ओळखला जात होता.

त्यामध्ये सध्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, रेसिडेन्सी क्‍लब, मराठा हाऊस (सध्या कमांडिंग ऑफिसरचे निवासस्थान), जिल्हा पोलिस प्रमुखांचे व अतिरिक्त पोलिसप्रमुखांचे निवासस्थान व जिल्हा न्यायाधीशांचे निवासस्थान, सध्याचे गव्हर्न्मेंट प्रेस, वीज मंडळाच्या परिसरतील इमारती, मेरिवेदर ग्राऊंड, बैल गोठा (सार्वजनिक बांधकाम अधिकारी निवास) अशा सर्वच इमारतींचा परिसर हा रेसिडेन्सी म्हणून ओळखला जात होता.

हेही वाचा- कागदपत्रे मिळविण्यासाठी संगमेश्‍वर तालुक्‍यातील इच्छुकांची धावपळ सुरु -

सध्याच्या ताराबाई पार्कमधील आदित्य कॉर्नरजवळ रेसिडेन्सीची एक पोलिस चौकी होती. लाईन बाजार, सदर बाजार, एस. टी. कॉलनी परिसरांत सैनिकांच्या छावणी होत्या. लक्ष्मी विलास पॅलेस ते नवा राजवाडा असा सगळा परिसर यात समाविष्ट होता. त्यामध्ये पोलिटिकल सुप्रिटेंडंट, पोलिटिकल एजंट व रेसिडेंट व इतर आधिकारी राहात असत. त्यांना एकत्र येण्यासाठी रेसिडेन्सी क्‍लब सुरू झाला.

... तरच पुढच्या पिढीला इतिहास समजेल
ताराबाई पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात आज या इमारती इतर बदलांच्या ओघात विस्कळीत झाल्यासारख्या झाल्या असल्या तरी त्या वापरात आहेत. इथली क्षितिज रेषा नव्याने झालेल्या इमारतींमुळे गमावली आहे; मात्र वारसा म्हणून गांभीर्य नसल्याने त्या इमारतींमध्ये वेगाने बदल केले जात आहेत. १८५७ च्या बंडादरम्यान या परिसरात अनेक चकमकी घडल्या आणि कोल्हापूरच्या विकासातही कारणीभूत झाल्या. त्यांना वारसा म्हणून जपले गेले तरच पुढच्या पिढीला इतिहास समजू शकेल.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resident Bungalow to Collector Residence heritage of kolhapur information uday gaikwad