पाऊस उठला शेतकऱ्यांच्या पोटावर ; हातातोंडाशी आलेला घास घेतला हिरावून

Resident Deputy Collector Bhausaheb Galande directed all tehsildar to conduct immediate panchnama of crops damaged due to rains
Resident Deputy Collector Bhausaheb Galande directed all tehsildar to conduct immediate panchnama of crops damaged due to rains

कोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाने घातलेल्या थैमानामुळे खरीप पिकावर अक्षरश: पाणी पडले आहे. भात, सोयाबीन मळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या खळ्याचे तळे झाले आहे. हातातोंडाशी आलेला भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणीसह इतर धान्यांचा घास हिरावून घेऊन पाऊस आता शेतकऱ्यांच्या पोटावर उठल्यासारखी परिस्थिती आहे. 

पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका सुरूच आहेत. दरम्यान, ऑक्‍टोबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी सर्व तहसीलदारांना दिले.  गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारीही सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू राहिला. रात्रीही पाऊस सुरूच होता.

इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांतही आज मुसळधार पाऊस पडला. राधानगरी धरण क्षेत्रातही धुवाँधार पाऊस कोसळत राहिला. धरणातून ७०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पाणी पातळी ११.५ फूट आहे. दरम्यान, पावसाचा कहर शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरवत आहे. काढणीला आलेला भात,सोयाबीन आणि भुईमुगाच्या शेतात पाण्याची तळी झाली आहेत. पाऊस सतत सुरू असल्याने भात कापणी, भुईमूग आणि सोयाबीनसह खरिपातील अन्य पिकांची काढणी ठप्प झाली आहे. त्यामुळे भात आणि भुईमुगाला कोंब फुटण्याची शक्‍यता आहे. 

त्यातच शनिवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या खरिपातील सर्वच पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. खरीप हंगामात पेरण्या झाल्यानंतर पाऊस लांबला होता, त्यामुळे पीक वाळून खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. काही ठिकाणी बियाणेच उगविले नव्हते. बियाणे, खतटंचाई आदी समस्यांना तोंड देत खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांच्या या कष्टाला यश येऊन पिकांच्या उत्पादनात यावर्षी वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागातर्फे व्यक्त करण्यात आला होता; 

मात्र गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसानीची प्रकरणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठवावीत. नुकसानीच्या निर्धारित दराने हे पंचनामे करावेत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी तहसीदारांना दिले आहेत. 
 

जिल्ह्यात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांचे भात, भुईमूग किंवा अन्य पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी संबंधित कंपनीकडे प्रस्ताव द्यावा.
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

दृष्टिक्षेप
 शाहूवाडीत रताळ्याची काढणी ठप्प
 गडहिंग्‍लजमध्ये मिरची, भात, भुईमुगाचे मोठे नुकसान 
 तोरणी येथे भिंत पडून दोन बैल जखमी  
 नाचणी, सोयाबीनचेही मोठे नुकसान  
 जयसिंगपूर, शिरोळमध्ये नाले आले रस्त्‍यावर 

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com