त्या घोटाळ्यात मोठे मासे सापडणार का? 

सुधाकर काशीद
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

रिक्षाच्या परवाना नूतनीकरणासाठी वापरलेल्या बनावट इन्शुरन्स पावती प्रकरणातील मोठे मासे कोण व त्यांच्यापर्यंत ही कारवाई पोहोचणार का? या महत्त्वाच्या प्रश्‍नांची रिक्षाचालक आत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर : रिक्षाच्या परवाना नूतनीकरणासाठी वापरलेल्या बनावट इन्शुरन्स पावती प्रकरणातील मोठे मासे कोण व त्यांच्यापर्यंत ही कारवाई पोहोचणार का? या महत्त्वाच्या प्रश्‍नांची रिक्षाचालक आत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. बनावट इन्शुरन्स पावत्या ज्या रिक्षाचालकांच्या कागदपत्रासोबत आहेत, त्यांना दोषी धरणे सोपे आहे; पण आरटीओ कार्यालयाच्या परिसरात एंजट व नेते म्हणून वावरणाऱ्या काही ठराविक जणांनीच ही कागदपत्रे करून दिल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे इन्शुरन्ससारख्या बनावट कागदपत्रांची बनावट छपाई कोणी करून घेतली, कशी करून घेतली, हा तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहे. 

हे पण वाचा - रामकंद छे ! हे तर... 
 

या क्षणी केवळ दोन-तीन रिक्षाचालकांना आरटीओ आणि बनावट इन्शुरन्सप्रकरणी नोटिसा काढल्या आहेत. त्यांचे परमिट रद्द करण्याचा इशाराही दिला आहे; पण केवळ दोन-तीन रिक्षाचालक हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. तीन-चार वर्षांतील इन्शुरन्स पावत्या तपासल्या तर फार मोठी बनावट इन्शुरन्स पावत्यांची यंत्रणा उघडकीस येणार आहे आणि ही यंत्रणा यांनी रिक्षाचालकांपर्यंत पोचवली ते संशयित एजंट कम नेते या प्रकरणातले मुख्य सूत्रधार ठरू शकणार आहेत. 

हे पण वाचा - नियमित कर्जदारांना लवकरच दिलासा : सहकारमंत्री 

बनावट इन्शुरन्स हा बनावट कागदपत्रे तयार करण्याचा गुन्हा तर आहेच; पण जर या बनावट इन्शुरन्स जोडलेल्या रिक्षाला अपघात होऊन प्रवासाची जीवितहानी झाली तर त्याला नुकसानभरपाई शून्य मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या बनावट इन्शुरन्सचा फटका बसणार आहे. कोल्हापुरातील रिक्षाचालक कष्टाळू आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 रिक्षा चालवतात. त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. त्यातून येणाऱ्या रोजच्या अडचणीतून कसाबसा मार्ग काढतात आणि रोज नव्याने तीन चाकांवरच्या आपल्या कष्टांना सामोरे जातात. रिक्षाचालकांच्या नेमका याच परिस्थितीचा फायदा काही दलालांनी घेतला आहे; मात्र या दलालीत काही ठराविक पुढारी मंडळी घुसली आहेत. 

बनावट पावत्यांची छाननी व्हावी 
पुढारीपणा करत काहींनी आरटीओ ऑफिसमध्ये वजन निर्माण केले आहे. त्यांच्याकडून कामे करून घेतली तर लवकर होतील म्हणून प्रामाणिक रिक्षाचालकांनी ते सांगतील तेवढे पैसे (दलाली) देऊन कामे करून घेतले आहेत आणि त्यातच घोटाळा झाला असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सर्व रिक्षाचालकांचे लक्ष लागून राहिले आहे. ठराविक दलालांना हेरून हेरून त्यांच्याकडे त्यांनी बनावट इन्शुरन्स पावत्या कुठून मिळवल्या, याची छाननी करणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw fake insurance receipt case