रिक्षा रस्त्यावर प्रवासी मात्र घरातच : दिवसभर रिक्षा फिरवून मिळाले 70 रूपये

प्रतिनिधी
रविवार, 24 मे 2020

कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी संचारबंदीत जिल्ह्यातील रिक्षा व्यवसाय 22 मार्चपासून बंद झाला होता. हाताला काम नसल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या कुटुंबांना त्याचा मोठा फटका बसला. दोनवेळच्या खाण्याचेही वांदे झाले. तरीही परिस्थितीचा सामना रिक्षा व्यावसायिकांनी केला. लॉकडाउनमधील निर्बंधावर शिथिलता आणून रिक्षा व्यवसाय सुरू करण्यास आज मुभा मिळाली.

कोल्हापूर ः तब्बल दोन महिन्यांनंतर शहरातील रिक्षा व्यवसाय सुरू झाल्याने चालकांना दिलासा मिळाला असला, तरी प्रवाशांची त्यांना प्रतीक्षा करावी लागली. परिणामी, थांब्यावर तुरळकच रिक्षा दिसत होत्या. सायंकाळपर्यंत व्यवसाय करूनही चालकांच्या हाती शंभर रुपयेही न पडल्याची नाराजी मात्र रिक्षा व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाली.
कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी संचारबंदीत जिल्ह्यातील रिक्षा व्यवसाय 22 मार्चपासून बंद झाला होता. हाताला काम नसल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या कुटुंबांना त्याचा मोठा फटका बसला. दोनवेळच्या खाण्याचेही वांदे झाले. तरीही परिस्थितीचा सामना रिक्षा व्यावसायिकांनी केला. लॉकडाउनमधील निर्बंधावर शिथिलता आणून रिक्षा व्यवसाय सुरू करण्यास आज मुभा मिळाली. घरात बसून कंटाळलेल्या रिक्षाचालकांनी आज सकाळीच रिक्षा बाहेर काढल्या. फक्त दोनच प्रवाशांची अट आणि त्यात लॉकडाउनमुळे प्रत्येकाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका रिक्षा व्यावसायिकांना बसला. एका थांब्यावरून दुसऱ्या थांब्यावर शहरातील मुख्य रस्त्यावर फिरूनही एक भाडे मिळताना चालकांच्या नाकीनऊ येत होते. त्यामुळे दुपारनंतर अनेक चालकांनी आपले व्यवसाय बंद केले. त्यांनी नियोजित वेळेपर्यंत व्यवसाय केला, त्यांच्या हाती इंधन खर्च वजा जाता जेमतेम 30 ते 40 रुपये हाती पडले. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर आम्ही करायचे काय, असा सवालही त्यांच्यातून उपस्थित होत होता.

सकाळी आठला व्यवसायाला सुरवात केली. सव्वातीन तासांनी पहिले प्रवासी भाडे मिळाले. दुपारी दोनपर्यंत फक्त 70 रुपयेच व्यवसाय झाला. त्यात सरासरी 40 रुपयांचे इंधन खर्च झाले.
- महादेव गायकवाड, कळंबा, रिक्षाचालक

व्यवसाय सुरू झाला, पाच तासांनंतर अवघे 65 रुपये इतकाच व्यवसाय झाला. रस्त्यावर माणूस नाही, जो आहे तो खिशात पैसे नसल्याने रिक्षात बसत नाही.
- फिरोज पठाण, राजारामपुरी, रिक्षाचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw passengers on the road but at home