esakal | 'रोज ऍपल' कसलं आहे हे फळ ? बेळगावात बहरलंय याचं झाड...
sakal

बोलून बातमी शोधा

rose apple tree in belgaum

औषधी गुणधर्म, फळप्रेमींसाठी पर्वणी....

'रोज ऍपल' कसलं आहे हे फळ ? बेळगावात बहरलंय याचं झाड...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - 'रोज ऍपल' या नावाचे फळ आहे, पण बेळगावकरांनी कधी या फळाचे नाव ऐकलेले नाही. हे फळ कसे दिसते, त्याची चव कशी आहे, त्याचे फायदे काय? हेसुद्धा बेळगावकरांना माहिती नाही. पण बेळगावचे माजी नगरसेवक सादीक इनामदार यांच्या उद्यानात याच रोज ऍपलचे झाड बहरले आहे. त्या झाडावर लगडलेली शेकडो रोज ऍपल पाहून अनेकांनी आश्‍चर्यही व्यक्त केले आहे. बेळगावचे वातावरण रोज ऍपलसाठी पोषक आहे हेसुद्धा यामुळे सिद्ध झाले आहे. इनामदार यानी महाराष्ट्रातून रोज ऍपलचे रोप आणले व आपल्या घराच्या आवारातील उद्यानात लावले. ते रोप मोठे झाले, ते फळांनी लगडले, पण त्या फळाचे महत्व इनामदार याना ठाऊक नव्हते. वरकरणी काजूसारखे दिसणाऱ्या या फळाचे महत्व त्यांच्या एका मित्राने त्याना सांगीतले. बेळगावात इनामदार व त्यांच्याच एका नातेवाईकांच्या घराच्या उद्यानात रोज ऍपलचे झाड आहे. यंदा या झाडाला भरपूर फळे लागली, इनामदार यानी ती फळे नातेवाईक व मित्रांना भेट म्हणून दिली आहेत.

वाचा - प्रसिद्ध 'दूधसागर' धबधबा तुम्ही पाहिलाय काय ? पण यंदा तुम्हाला तिथे जाता येणार का...?

सादीक इनामदार हे बेळगावचे माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी आपल्या घराच्या आवारात रोज ऍपलचे झाड लावले आहे. पण त्यांना या रोज ऍपलचे महत्वच ठाऊक नव्हते. विदेशात हे फळ मोठ्या प्रमाणात मिळते. पण भारतात या फळाचे उत्पादन घेतले जात नाही. काहीनी हौसेखातर या फळाची झाडे आपल्या उद्यानात किंवा फार्म हाऊसमध्ये लावली आहेत. हे फळ बाजारतही उपलब्ध नसते. पण हे फळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. सादीक यांच्य मित्रांनी त्याना ते गुणधर्म सांगीतल्यावर त्यानाही आश्‍चर्य वाटले. रोज ऍपल हे लाल, पांढऱ्या व हिरव्या रंगाचेही असते. सादीक यांच्या उद्यानातील रोज ऍपल हे लाल रंगाचे आहे. या फळामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, मधुमेह असणाऱ्यांना हे फळ खूपच फायदेशीर ठरते. गर्भवती महिलांसाठीही हे फळ खूप लाभदायक असते असे सादीक इनामदार यानी 'सकाळ'ला सांगीतले. फळाचे महत्व समजल्यानंतर मित्र व नातेवाईकांना ते दिले अशी माहितीही त्यानी दिली.

वाचा - कोल्हापूर जिल्हयातील धबधबे लॉकडाउन ; पंचगंगा नदी घाटावर वर्षाप्रेमींची गर्दी...

आंबा, फणस, डाळींब, द्राक्षे यांचे उत्पन्न बेळगाव जिल्ह्यात होते. सफरचंद, स्ट्रॉबेरी यांचे उत्पादन बेळगाव जिल्ह्यात होत नाही. पण नवखे पण आरोग्यासाठी महत्वाचे असलेले रोज ऍपलचे उत्पादन बेळगावात घेता येते. पण दुर्देवाने या फळाबद्दलची माहितीच बेळगावकरांना नाही. आता इनामदार तसेच त्यांच्या काही नातेवाईकांमुळे या फळाची माहिती बेळगावकरांना समजली आहे. त्यामुळे बेळगावकरांनी इनामदार यांचे अनुकरण करून रोज ऍपलचे एक झाड आपल्या परसदारी लावण्यास हरकत नाही.