विद्यार्थ्यांनो सावधान: नवी फॅशन येईल आता अंगलट

राजेश मोरे
Thursday, 21 January 2021

आरसा नसलेल्या ७५ वाहनांवर कारवाई
शाळा-महाविद्यालय परिसरात आरटीओची आता मोहीम
 

कोल्हापूर :  एरवी प्रत्येकाला हवा असणारा आरसा गाडीला मात्र लावायचा नाही. सुरक्षित वाहतुकीला घातक ठरणारी ही नवी फॅशन मोडून काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) पुढे सरसावला आहे. आरटीओने आरसा नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करत ७८ हजारांहून अधिकचा दंड वसूल केला. कारवाईची ही मोहीम आता शाळा- महाविद्यालय परिसरात राबवण्यात येणार आहे.

बदलत्या युगात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४० ते ५० हजार वाहनांची वाढ होते. नववी, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळा, क्‍लासला जाण्यासाठी गाडीचा हट्ट सुरू होतो. त्यांच्या हट्टापुढे काही पालक गुडघे टेकतात. परिणामी आज कॉलेजकुमारांच्या हातात सर्रास वाहन पाहावयास मिळते. त्यातील अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो, अगर त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहितीही नसते. 

वाहनांना लावलेल्या आरशातून पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेता येतो. वळण घेताना, वाहन थांबविताना, वाहनांची गती कमी-जास्त करताना त्याचा फायदा चालकाला होतो. यातून संभाव्य अपघात टाळले जाऊ शकतात; पण सध्या स्टाईल मारण्यासाठी मोपेड, मोटारसायकलला असणारे आरसे काढण्याची नवी फॅशन बनू लागली आहे. आरसा नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा पवित्रा आरटीओने घेतला आहे. गेल्या काही दिवसांत आरटीओने महामार्गावर आरसे नसणाऱ्या मोपेड, मोटारसायकलींवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल ७८ हजारांहून अधिकचा दंडही वसूल केला. 

हेही वाचा- अजित पवारांचा जयंत पाटील यांना पाठिंबा  -

दृष्टिक्षेपात...
 जिल्ह्यातील दुचाकींची संख्या      ६२ हजार ४२४
 आरसा नसलेल्या वाहनांची तपासणी     २५४
 दोषी वाहने    ५२
 निकाली वाहने    २३
 दंड वसूल    ७८ हजार २०० रुपये.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO campaign now on school-college campus in kolhapur news letest news marathi news