उच्चभ्रूकडूनच नियम धाब्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 एप्रिल 2020

औद्योगिक शहर असलेल्या वस्त्रनगरीत प्रत्येक घटक कुणाच्या तरी लढ्यासाठी सहकार्य करत आहे; मात्र नेमके उच्चभ्रू लोक आणि त्यांच्या कॉलनीतील जनता हे सर्वजण नियम पायदळी तुडवत आहेत. आज सकाळी अनेक सोशल मीडियावर या लोकांचे मॉर्निंग वॉक आणि रस्त्यावर धावण्याचा व्यायाम याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

इचलकरंजी : औद्योगिक शहर असलेल्या वस्त्रनगरीत प्रत्येक घटक कुणाच्या तरी लढ्यासाठी सहकार्य करत आहे; मात्र नेमके उच्चभ्रू लोक आणि त्यांच्या कॉलनीतील जनता हे सर्वजण नियम पायदळी तुडवत आहेत. आज सकाळी अनेक सोशल मीडियावर या लोकांचे मॉर्निंग वॉक आणि रस्त्यावर धावण्याचा व्यायाम याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्राची मॅंचेस्टर नगरी म्हणून समजल्या जाणाऱ्या या शहरात कष्टकरी जनता मोठ्या प्रमाणात आहे. दाट लोकवस्ती असलेले राज्यातील एक मोठे शहर म्हणून याकडे पाहिले जाते. साहजिकच एखादा संसर्ग झालाच तर आटोक्‍यात आणणे मोठे मुश्‍कील आहे. म्हणूनच प्रशासनाने पहिल्यापासूनच योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. पोलिस, नगरपालिका प्रशासन, आरोग्य खात्यातील कर्मचारी, डॉक्‍टर, फार्मासिस्ट यांच्यासह अनेक घटक रात्रंदिवस या शहराच्या रक्षणासाठी झटत आहेत.

गोरगरीब जनतेला दररोज काम केल्याशिवाय पर्याय नाही. तरीही या लढ्यात आपलाही सहभाग म्हणून ते घरीच बसून आहेत. 
शहरातील परिस्थिती आणखी आटोक्‍यात आणण्यासाठी नगरपालिकेने प्रत्येक प्रभाग सील केले आहेत. साहजिकच यापूर्वी पोलिसांच्या येणाऱ्या गाड्या आता या प्रत्येक झोनमध्ये कमी झाल्या आहेत. याचा फायदा उच्चभ्रू लोक घेत आहेत.

सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉक नियमितपणे सुरू झाला आहे. एवढेच नव्हे तर तरुण वर्ग जमावाने या कॉलनीमध्ये धावत असल्याचे चित्र सर्रासपणे पाहावयास मिळत आहे. सकाळी सहा ते सात या वेळेत अनेक रस्त्यांवर मोठी गर्दी दिसत आहे. काम केल्याशिवाय पोटाला मिळत नाही अशी कष्टकरी जनता घरात बसून राहिली आहे; मात्र हे उच्चभ्रू लोक नियम पायदळी तुडवत आहेत. या कृत्याचा अनेक ठिकाणी संताप व्यक्त होत आहे. आज तर सोशल मीडियावरून अनेक ठिकाणांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांना आवर घालण्याची वेळ आता आली आहे. 

ना दंड, ना काठीचा मार 
या लोकांवर राजकीय लोकांचा कायमच वरदहस्त राहिला आहे. त्यामुळे अनेक वेळा प्रशासनाला सांगूनही या भागात आजपर्यंत कधीच लाठीचा मार झालेला नाही. सध्या बिनधास्तपणे मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांवरही कारवाई झालेली नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rules from the upper eyebrows