सफारी नाही आता वर्दीवरच ड्यूटी ;  रुबाब येणार कमी, बंदोबस्त जादा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

आता या सर्वांनाच डीबी बरखास्त केल्याने खाकी वर्दीवरच "ड्यूटी' करावी लागत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात सारेच वर्दीवर दिसू लागले आहेत. 

कोल्हापूर : कधी सफारी, कधी जीन्स तर कधी फॉर्मल यामुळे ते पोलिस आहेत की नाहीत, ओळखतच नव्हते. खरंच ते होते डीबीचे पोलिस. ते कधीतरीच अंगावर वर्दी चढवत होते. "डिटेक्‍शन'पेक्षा त्यांचे "इंटरेस्ट' वरिष्ठांच्या लक्षात आले. एवढंच नव्हे तर काही जण चक्क "एसीबी'च्या जाळ्यातही अडकले. आता या सर्वांनाच डीबी बरखास्त केल्याने खाकी वर्दीवरच "ड्यूटी' करावी लागत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात सारेच वर्दीवर दिसू लागले आहेत. 

गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात डीबी (गुन्हेशोध) पथकाची नेमणूक असते. या पथकाने हद्दीतील चोऱ्या, घरफोड्यांसह हाणामाऱ्या, अवैध धंदे यावर अंकुश ठेवणे क्रमप्राप्त असते. अशा डीबी पथकात नाही, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत वर्णी लागावी म्हणून अनेकांची फिल्डिंग लागलेली असते. त्यामुळे काही वर्षांपासून या पथकात तेच तेच चेहरे पाहावयास मिळत होते. पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांनी सूत्रे हाती घेतल्यावर जिल्ह्यातील घरफोड्या, मोटारसायकल चोऱ्यांच्या गुन्ह्यांची उकल करा, हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याचे आदेश डीबी पथकाला दिले होते. पण, "डीबी'चे असमाधानकारक काम पाहून त्यांनी चार दिवसांपूर्वी ही पथके बरखास्त केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील एकमेव पथक याला अपवाद ठरले. 

डीबी पथकाची परीक्षेद्वारे पुनर्रचना 
पथके बरखास्त झाल्यावर यात पथकातील मंडळी वर्दीवर दिसत आहेत. आता डिटेक्‍शन व्यतिरिक्त जनरल ड्यूटीसह बंदोबस्तातही हे चेहरे दिसू लागले. डीबी पथकाची पुनर्रचना ही परीक्षा घेऊन केली जाणार आहे. त्यात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या सूचना अधीक्षक बलवकडे यांनी केल्या आहेत. त्यामुळे नव्या पथकात वर्णी लागेल का, अशी धाकधूकही त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Safari is no longer on duty in uniform; Rubab will come less, security more

टॉपिकस
Topic Tags: