
रत्नदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद व जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने हे मैदान भरवण्यात आले होते
चंदगड - सडेगुडवळे (ता. चंदगड) येथे श्री रामलिंग यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती मैदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर, सांगली व इतर भागातून 68 पैलवानांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांसाठी सांगलीचा सागर मोहोळकर व कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात झाली. त्यामध्ये मोहोळकरने बाजी मारत 51 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. जिल्हा कुस्ती संघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र कैसरी पैलवान विष्णू जोशीलकर अध्यक्षस्थानी होते.
रत्नदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद व जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने हे मैदान भरवण्यात आले होते. 51 हजाराची पहिली मानाची कुस्ती होती. 20 हजारासाठी दोन कुस्त्या, 8 हजारसाठी 3 कुस्त्या त्याचबरोबर पाच हजार, 3 हजार, दिड हजार आणि आठशे रुपयांसाठीही कुस्त्या झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुस्ती मैदान बंद असताना जिल्ह्यात कुस्ती भरवणारे हे पहिलेच मैदान ठरले. आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच राम पवार, रामदास देसाई, हणमंत गुरव, सागर शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
हे पण वाचा - धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार
विष्णू जोशीलकर म्हणाले, ""कुस्ती हा मर्दानी खेळ आहे. या खेळातून मानसिक आणि शारीरीक विकास होतो. पालकांनी आपल्या मुलांसाठी या खेळाची निवड करणे गरजेचे आहे. चंदगड तालुक्यात पुन्हा एकदा कुस्तीची परंपरा सुरु व्हावी.'' या वेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सादिक पटेल, मारुती पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे प्रकाश गावडे यांनी स्पर्धेचे संयोजन केले.
संपादन - धनाजी सुर्वे