Sakal News Viral : ब्लड कॅन्सरने पिडीत असलेल्या सिद्धीच्या मदतीला आले दातृत्वाचे हजारो हात !

मतीन शेख
Thursday, 18 February 2021

ब्लड कॅन्सरने पिडीत असलेली  चौथीत शिकणारी सिद्धी कांबळे. काही दिवसापुर्वी तिला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले अन् तिच्या मजुरी करणाऱ्या आई वडिलांवर आभाळ कोसळलं.

कोल्हापूर : ब्लड कॅन्सरने पिडीत असलेली 
अडूर (ता.करवीर) येथील चौथीत शिकणारी सिद्धी कांबळे. काही दिवसापुर्वी तिला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले अन् तिच्या मजुरी करणाऱ्या आई वडिलांवर आभाळ कोसळलं. उपचारासाठी १० ते १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. परंतू हा उपचार घेऊ न शकणाऱ्या सिद्धीची हतबल कहाणी दै.सकाळच्या माध्यमातून प्रसिद्ध होताच दातृत्वाचे हजारो हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यामुळे तिला पुढील उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

 कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात ती सध्या उपचार घेत आहे.अभ्यास करुन मोठ्ठ होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सिद्धीला कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने गाठलं. मोल मजुरी करणारे सिद्धीचे वडील मोहन कांबळे यांना या उपचाराचा खर्च न पेलवणारा होता. ही गोष्ट सकाळने मांडल्या नंतर अनेक दानशुर मदतीसाठी पुढे आले आहेत. पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेकडून 61 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर प्राजक्ता करंजकर यांनी ३५ हजार सिद्धीच्या मदतीसाठी दिले आहेत. टि.व्ही.एस. क्रेडिट सर्व्हिस कंपनी कडून 35 हजाराची मदत करण्यात आली आहे.

हेही वाचा- Good News: आता करा सोने खरेदी; तोळ्याला आहे एवढा दर

तसेच शालिनी कर्करोग उपचार निधी ट्रस्ट,मानसी साळोखे,विशाल वाघमारे,अशपाक काझी,संग्राम कांबळे,किशोर शिंदे,सुनिल बिरेदार,सुनिद दळवी तसेच शिवाजी विद्यापीठ मित्र परिवार आदी अनेकांनी सिद्धीच्या उपचारासाठी मदत पाठवली आहे. कोल्हापूर उत्तरचे मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी देखील सिद्धी काबंळेचा पुढील उपचार मुंबईत मोफत करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या दानशुरांच्या मदतीमुळे सिद्धीच्या उपचारास मदत होणार आहे.

हेही वाचा- Video : कोल्हापुरात कम्युनिस्टचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात पाहा व्हिडीओ

सोशल मिडीयाद्वारे मिळवली फेसबुक, व्हॉट्स अॅपवर वर सिद्धीची कहाणी व्हायरल होताच अनेक जण मदतीला धावले. आम्ही कोल्हापुरी या ग्रुप वरती दै.सकाळची बातमी शेअर झाल्याने सिद्धीच्या मदतीला अनेक कोल्हापुरकर आले.अनेकांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसला सिद्धीसाठी मदतीचे आवाहन केले गेले. राज्यभरातुन तसेच नॉर्वे देशातून ही सिद्धीसाठी मदत मिळाली.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal impact siddhi kamble help in social media kolhapur marathi news