50 हजार शेतकऱ्यांची पत्रे घेवून समरजितसिंह घाटगे राज्यपालांच्या भेटीला...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांवर झालेला अन्याय आणि सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकर्‍यांच्याच पत्राद्वारे थेट राज्यपालांकडे पोहोचवण्याचा निश्चय समरजितसिंह घाटगे यांनी केला होता.

कोल्हापूर - सरकारने कर्जमाफी योजनेमध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्य़ा शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. राज्य सरकारने दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. या योजनेतील चुकीच्या निकषांमुळे कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यातील बहुतांशी शेतकर्‍यांना झालाच नाही. जिल्ह्यातील शेतकरी स्वाभिमानी आहेत. घेतलेली कर्जे वेळेत भरली जातात, मात्र कर्ज वेळेवर भरणे हा त्यांचा दोष आहे? अशी आपली व्यथा कोल्हापुर जिल्ह्यातील 50 हजार शेतकर्यांनी पत्राद्वारे राज्यपालांपुढे मांडणार आहेत.

शेतकऱ्यांच्या वेदना थेट राज्यपालांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय

भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान सरसकट कर्जमाफीच्या मागणीची 50 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना थेट राज्यपालांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे.

वाचा - ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली.... 

शेतकऱ्यांनी चक्क रक्ताने पत्र लिहिली

नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांवर झालेला अन्याय आणि सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकर्‍यांच्याच पत्राद्वारे थेट राज्यपालांकडे पोहोचवण्याचा निश्चय समरजितसिंह घाटगे यांनी केला होता. त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची पत्र जमा करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दहा दिवसात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांचाही या मोहिमेला प्रतिसाद मिळाला. तब्बल 50 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या हाताने लिहिलेली पत्र राज्यपालांकडे पाठवण्यासाठी दिली. यातील तीन शेतकऱ्यांनी चक्क रक्ताने पत्र लिहिली.

समरजितसिंह घाटगे या शेतकऱ्यांची पत्र घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी मुंबईत राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांची पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samarajitsingh ghatge will meet governor bhagatsingh koshyar