आजऱ्यातून पक्ष्यांचे नमुने भोपाळला; "बर्ड फ्ल्यू'चा धोका नाही

रणजित कालेकर
Thursday, 14 January 2021

"बर्ड प्ल्यू'चा सध्यातरी तालुक्‍यात कोणताही धोका नाही. तालुक्‍यासह जिल्ह्यात कुकुटपालनाचा व्यवसाय हा शास्त्रोक्त पध्दतीने केला जातो. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी आहे.

आजरा : "बर्ड प्ल्यू'चा सध्यातरी तालुक्‍यात कोणताही धोका नाही. तालुक्‍यासह जिल्ह्यात कुकुटपालनाचा व्यवसाय हा शास्त्रोक्त पध्दतीने केला जातो. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी आहे. तालुक्‍यातील विविध पोल्ट्री फार्मवरील पक्ष्यांचे 45 प्रकारचे रक्त नमुने, नाकातील स्त्राव व विष्ठेचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे पशुधन अधिकारी (विस्तार) पी. एम. जालकर यांनी आज पंचायत समितीच्या सभेत दिली. या वेळी ग्रामीण रुग्णालयातील पन्नास बेडच्या हॉस्पीटलच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली. सभापती उदयराज पवार अध्यक्षस्थानी होते. 

सदस्य शिरीष देसाई यांनी केंद्रीय मंत्री बुटासिंग, विजया सावंत, यशवंत सावंत यांच्या आदरांजलीचा ठराव मांडला. आरोग्य अधिकारी वैशाली केळकर-सातोसकर यांनी ग्रामीण रुग्णालया आढावा मांडला. या वेळी पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई म्हणाले, ""1991 पासून तीस बेडचे रुग्णालय आहे. त्याला आता पन्नास बेडची मंजूरी मिळाली आहे. नवीन प्लॅनसाठी त्रुटींची पुर्तता करून सादर करावा. आजरा हे अतिदुर्गम भागात असल्याने आरोग्य सेवा देणे महत्वाचे बनले आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पाठपुरावा करावा. गोरगरीबांना खासगी आरोग्य सेवेचा लाभ घेणे खर्चिक आहे. कोरोनासह अन्य आजारांचा प्रार्दुभाव होत असतांना आरोग्य सेवा सक्षम करण्याची गरज आहे.'' दरम्यान, त्यांनी बांधकाम व ग्रामीण रुग्णालयाची स्वंतत्र बैठक लावण्याची मागणीही केली. 

शिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांनी शिक्षण विभागाचा आढावा मांडला. स्वाध्याय व गोष्टीचा शनिवार हे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जात आहेत. यामध्ये 2 हजार 553 विद्यार्थींनी सहभाग नोंदवला आहे. सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी अजून सहभाग नोंदवला नाही. ऍनड्राईड मोबाईल नसल्याने विद्यार्थी वंचित राहण्याची शक्‍यता आहे. सभापती पवार यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी पालकांचे प्रबोधन करावे, असे सांगितले. सदस्या रचना होलम म्हणाल्या, ""शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून उपक्रमाचे महत्व पटवून द्यावे.'' होलम यांनी सुळे ते नेसरी रस्ता खराब झाल्याकडे लक्ष वेधले. याची दुरुस्ती करावी, असे सांगितले. या वेळी कृषी, बांधकाम, एसटी, वीज यासह विविध विषयावर चर्चा झाली. सदस्य बशीर खेडेकर व विविध विभागाचे प्रमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला. गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. 

खबरदारी घेतली आहे
तालुक्‍यात बर्ड प्ल्युचा कोणताही संसर्ग नाही. पशुधन विभागाकडून सर्व्हेक्षण सुरू आहे. तालुक्‍यात 343 पोल्ट्री शेड आहेत. पक्ष्यांची संख्याही सुमारे पाच लाखांच्या आसपास आहे. पोल्ट्री धारकांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. परिसर स्वच्छतेबरोबर औषध फवारणीसह विविध उपाय योजना राबविण्याबाबत खबरदारी घेतली आहे. 
- पी. एम. जालकर, पशुधन अधिकारी, आजरा 

 

संपादन - सचिन चराटी
kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samples Of Birds From The Sick Sent To Bhopal For Investigation; But There Is No Risk Of "bird flu" Kolhapur Marathi News