सरपंच-उपसरपंच ठरले, आता विकासाचे आव्हान

Sarpanch-Deputy Sarpanch Elections Have Been Held, Now The Challenge Of Development Kolhapur Marathi News
Sarpanch-Deputy Sarpanch Elections Have Been Held, Now The Challenge Of Development Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : तालुक्‍यातील सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडी पूर्ण झाल्या. याद्वारे गावचे कारभारी ठरले. आता निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता आणि गावच्या विकासाचे आव्हान नव्या कारभाऱ्यांना पेलावे लागणार आहे. दुसऱ्या बाजूला पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या निधीतून विकासाची संधीही त्यांच्यासमोर चालून आली. या संधीचे सोने करण्यासाठी नव्या गावकारभाऱ्यांनी कंबर कसायला हवी. 

ग्रामीण भागात आपल्या गावची निवडणूक म्हणजे गावपुढाऱ्यांसाठी मोठ्या प्रतिष्ठेची मानली जाते. जानेवारीत तालुक्‍यातील 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. 9 फेब्रुवारीला होणाऱ्या सरपंच निवडी न्यायालयीन प्रक्रियेमुळे 25 फेब्रुवारीला झाल्या. प्रत्येक गावचे कारभारी आता ठरले आहेत.

सरपंच व उपसरपंचपदाचे काटेरी मुकुट इच्छुकांनी परिधान केले आहे. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर झाला. बहुतांश गावांमध्ये बिनविरोध निवडी झाल्या. काही चुरशीच्या गावात मतदान झाले. सरपंच निवडीत "राष्ट्रवादी'ने बाजी मारली असून, सुमारे 21 ते 23 गावांत या पक्षाचे सरपंच झाले. त्या खालोखाल स्थानिक आघाडीला 15, भाजपला पाच, शिवसेनेला चार, जनता दलाला दोन आणि कॉंग्रेसच्या पदरात एक सरपंचपद पडले. 

कारभारी निश्‍चित झाल्यावर आता खऱ्या अर्थाने गावचा कारभार हाकण्यास सुरवात होणार आहे. सरपंचपदावर अनेक नवीन चेहरे असल्याने त्यांना पहिल्यांदा काही महिने ग्रामपंचायत समजून घ्यावी लागेल. गावच्या विकासाचा आराखडा करून टप्प्याटप्प्याने त्याची पूर्तता करण्याचे कसब कारभाऱ्यांना पार पाडावे लागणार आहे. शासन 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करणार असल्याने कामे करण्याची संधीही चालून आली.

गावाला काय गरज आहे, हे ओळखून या निधीचा विनियोग करणे हिताचे ठरेल. एकंदरीत, विकासात आदर्श गावची संकल्पना पूर्णत्वाला नेण्यासाठी नव्या कारभाऱ्यांसमोर आव्हानाचा डोंगर पार करावा लागणार आहे. 

आश्‍वासनांची आठवण हवी... 
निवडणुकीत जनतेला दिलेली आश्‍वासने आठवणीत ठेवून ती पूर्ण करण्याचे आव्हान नव्या कारभाऱ्यांसमोर असेल. शासनाच्या अनेक योजना असून, त्याद्वारे आमदार व खासदारांकडे पाठपुरावा करून गावच्या विकासासाठी निधी खेचून आणणे शक्‍य आहे. मात्र, यासाठी कारभाऱ्यांना गावासाठी वेळ द्यावा लागेल. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com