'भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यातच सुख वाटते' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

मध्यमवर्गीयांचे कंबरड मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटातून कसे सावरायचे, याचे उत्तर लोकांना सापडत नाही. उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर आलेले नाहीत, यातच आता प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जात आहे. भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यातच सुख वाटत असल्याची टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली. कॉंग्रेस कमिटीमध्ये झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यानंतर याच आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. तसेच, इंधन दरवाढीविरोधात कोल्हापूर जिल्हा शहर आणि कॉंग्रेस कमिटीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शने केली. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, स्पीकअप इंडियाद्वारे पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशव्यापी धरणे आंदोलन करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना दिली आहे. कोरोनामूळे देश आर्थिक संकटात आहे. मध्यमवर्गीयांचे कंबरड मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. मात्र, सर्वसामान्य लोकांच्या दु:खात सुख मानणारे सरकार केंद्रात आहे. लोकांना दु:खात घालून आपण सुखी राहण्याची भूमिका सरकारची आहे. या अनुषंगाने कोल्हापूर शहर आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे धरणे आंदोलन करुन इंधन दरवाढीचा निषेध केला. त्यानंतर आमदार राजू आवळे, आ. चंद्रकांत जाधव आणि महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह मोजक्‍या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. 

हे पण वाचा -  फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची ‘हसीन’स्वप्ने; वाचा, कोणी केली टीका? ​

कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. इंधन दरवाढीने दुहेरो संकटाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या महिन्याभरात तेरा रुपयांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला व्हावा अशी विनंती कॉंग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. देशामध्ये झालेल्या इंधन वाढीमुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे केंद्र शासना दुर्लक्ष करत आहे. वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून अन्न धान्य तसेच सर्वच वस्तू पुरविल्या जातात. त्यामुळे इंधन दरवाढ केली की महागाई वाढते. याचा भार मध्यमवर्गीय आणि सामन्यावर बसत असल्याचे पालकमंत्री सतीस पाटील म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satej patil criticism on central government