सतेज पाटील पुन्हा ठरले "किंग मेकर' ; पश्‍चिम महाराष्ट्रात दबदबा  

सुनील पाटील 
Friday, 4 December 2020

शिक्षक किंवा पदवीधरची एक जागा कॉंग्रेसला द्या, ती निवडून आणतो असा "शब्द' श्री. पाटील यांनी दिला होता

कोल्हापूर - पुणे शिक्षक मतदार संघात कॉंग्रेसचा उमेदवार ठरवण्यापासून ते उमेदवारीच्या स्पर्धेतील दिग्गजांना माघार घ्यायला लावून त्यांना कॉंग्रेसच्या प्रचारात सक्रिय करण्यापर्यंतच्या कामात सक्रिय सहभाग घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे पुन्हा एकदा "किंगमेकर' ठरले. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील तीन आमदार निवडून आणताना पक्षश्रेष्ठीसह पक्षात दबदबा निर्माण करणाऱ्या श्री. पाटील यांचा पश्‍चिम महाराष्ट्रातील करिष्माही यानिमित्ताने पहायला मिळाला. 

शिक्षक किंवा पदवीधरची एक जागा कॉंग्रेसला द्या, ती निवडून आणतो असा "शब्द' श्री. पाटील यांनी दिला होता. त्याचबरोबर या निवडणुकीच्या मतदानादिवशी पदवीधरमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची "हॅट्रट्रीक' नव्हे तर "क्‍लिनबोल्ड'चे अशी घोषणा केली होती. हे दोन्हीही शब्द त्यांनी खरे करून दाखवले. या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात पक्षाची किंबहुना स्वतःचीही ताकद दाखवण्यात ते यशस्वी झाले.
 
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसमुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात श्री. पाटील यांनी भाजपाला चारीमुंड्या चित करताना पारंपारिक विरोधक असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र व त्यावेळचे आमदार अमल महाडिक यांचा पराभव करून पुतण्याला त्यांच्या विरोधात निवडून आणले. त्याचबरोबर उत्तर आणि हातकणंगलेतही आपली जादू दाखवताना विधानसभा निवडणुकीत ते "किंगमेकर' ठरले होते. त्यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा आपले नेतृत्त्व सिध्द करून दाखवले. 

शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले प्रा. जयंत आसगावकर हे तसे नवखे. सांगरूळमधील शिक्षण संस्था आणि तेवढ्या परिसरापुरतेच त्यांचे अस्तित्त्व पण शांत, संयमी आणि श्री. पाटील यांच्याशी एकनिष्ठता या जोरावर त्यांना उमेदवारी मिळाली. त्याचवेळी उमेदवारीच्या स्पर्धेतील दादा लाड, भरत रसाळे, सौ. रेखा पाटील अशा दिग्गज इच्छुकांपैकी लाड व इतरांना त्यांनी नुसती माघार घ्यायला लावली नाही तर प्रा. आसगांवकर यांच्या प्रचारातही सक्रिय केले. त्याचाही परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसला. 

राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार असताना सतेज पाटील यांनी विधानपरिषदेची निवडणूक जिंकली. त्यानंतर पक्षाची बांधणी करून महापालिकेत आघाडीची सत्ता आणली. त्यानंतर जिल्हा परिषेदतही सत्तांतर घडवून आणताना त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या बजरंग पाटलांसारख्या कार्यकर्त्याला अध्यक्ष केले. लोकसभेला "आणचं ठरलंय' म्हणत पडद्यामागे व्युहरचना करून त्यांनी शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलीक यांनाही विजयी केले. याच निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाया रचला गेला. विधानसभा निवडणुकीत तर सतेज पाटील यांनी करवीर, उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात कॉंग्रेसला यश मिळवून दिले. त्यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात कॉंग्रेसचे चार उमेदवार निवडून आले. या सर्वच निवडणुकांमध्ये ते विजयाचे शिल्पकार ठरले. गेल्या महिन्यात दसरा चौकामध्ये केंद्राच्या कृषी धोरणाविरोधात कॉंग्रेसचा ट्रॅक्‍टर मोर्चाची सभा झाली. "विधानपरिषदेच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघातील कोणतीही उमेदवारी कोल्हापुरला द्या विजयाची जबाबदारी मी घेतो.' असे आवाहन त्यांनी पक्ष नेतृत्वाला केले. ते आव्हानही खरे करून दाखवले. 

या शिवाय डाव्या आणि पुरोगामी संघटनांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे येथील मते मिळवण्याचे आव्हानही त्यांच्या समोर होते. मात्र परिपूर्ण नियोजन, पाठपुरावा आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून केलेल्या राजकीय खेळी यामुळे त्यांनी प्रा. आसगावकरांना विजयी करून दाखवले. सोलापूर, सांगली, सातारा येथे जावून त्यांनी मेळावे घेतले तसेच कार्यकर्त्यांची जोडणी लावली. प्रा. आसगावकर यांच्या विजयात सतेज पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी स्वतःचे असे कार्यकर्त्यांचे जाळेही पाच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात विकसित केले. 

हे पण वाचाशिक्षक, पदवीधरच्या निकालाने चंद्रकांतदादांना सणसणीत चपराक  
 
क्‍लिनबोल्ड करून दाखवले 
विधान परिषदेच्या मतदाना दिवशी पालकमंत्री सतेज पाटील यांनी चंद्रकात पाटील यांची हॅट्रीक हुकणार व ते क्‍लिनबोल्ड होणार असे भाकित वर्तवले होते. पक्षाने सुक्ष्म नियोजन करून प्रचार केला असून विजय आमचाच असल्याची त्यांनी खात्री वर्तवली होती. त्यांचे भाकीत खरे ठरले. त्यांनी चंद्रकांत पाटील यांना क्‍लिन बोल्ड करून दाखवले. 

हे पण वाचा - चंद्रकांत दादांचा एक चेहरा दुसऱ्याला मदत केल्याचा, तर दुसरा काटा काढण्याचा  
 
जबाबदारी वाढली 
या निकालाने श्री. पाटील यांच्यावरील पक्षाची जबाबदारीही वाढली आहे. आगामी महापालिकेसह "गोकुळ' आणि जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही त्यांच्या उमेदवारीचा कस लागणार आहे. महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात हे तिन्हीही पक्ष वेगळे लढतील, त्यातही कॉंग्रेसच्या जास्त जागा निवडून आणणे त्यांच्यासमोर आव्हान असेल. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satej patil king maker in Pune graduate election