Good News : आता न्यूमोनियामुळे बालके दगावणार कमी; कोल्हापूरच्या सौरभचे संशोधन

नंदिनी नरेवाडी-पाटोळे 
Friday, 15 January 2021

इन्फेक्‍शनमध्ये प्रोटिनला विरोध करणाऱ्या औषधाचे सौरभ यांचे संशोधन

कोल्हापूर : मानवी शरीरात बॅक्‍टेरियल आणि व्हायरल अशा दोन्ही पद्धतीने इन्फेक्‍शन होते. यातील बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शनमुळे न्यूमोनिया होण्याचा संभव असतो. लहान मुलांत अशा इन्फेक्‍शनचे प्रमाण जास्त आहे. यावर उपलब्ध असणाऱ्या औषधांत अँटी मायक्रोबियल ड्रग कधी-कधी परिणामकारक ठरत नाही. त्यामुळे जगभरात न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लहान मुलांची संख्या जास्त आहे. यावर पर्याय शोधत उपलब्ध औषधांचे कीट वापरून सौरभ पिसे यांनी कॅप्सूलमधील सीपीएसडी प्रोटिनला विरोध करणाऱ्या नव्या औषधाबाबत संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे बालकांचे न्यूमोनियामुळे होणारे मृत्यू कमी होण्यास मदत होईल.

 पिसे मूळचे आपटेनगर येथील. घरी आई, वडील आणि भाऊ असे चौकोनी कुटुंब. सौरभ बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षात शिकत असताना वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या आजारपणात सौरभ यांना औषधनिर्मितीबाबत उत्सुकता निर्माण झाली. यातील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी ‘स्टेम सेल्स ॲण्ड री जनरेटिव्ह मेडिसीन’मधून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर परदेशात औषधनिर्मितीत संशोधन करावे, यासाठी विविध देशांतील नामांकित विद्यापीठांत संशोधनासाठी द्यावा लागणाऱ्या परीक्षांची तयारी सुरू केली. 

हेही वाचा- शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. बी. पाटील पुरस्कारांचे  वितरण -

ऑस्ट्रेलियातील ‘द. युनिव्हर्सिटी ऑफ ॲडलेड’ या विद्यापीठाने सौरभ यांना ‘ड्रग डिस्कवरी ॲण्ड डेव्हलपमेंट’ या विषयात संशोधन करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करीत त्यांनी न्यूमोनिया आजारात लहान मुलांना परिणामकारक औषधनिर्मितीचा ध्यास घेतला. ॲडलेड युनिव्हर्सिटीमध्ये बी. टेक. (बायो मेडिकल सायन्स) या विषयात एम.एस.चे शिक्षण पूर्ण केले. यासाठी त्यांना डॉ. अलिस्टेअर स्टॅंडिश यांचे मार्गदर्शन लाभले.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saurabh research on a drug that fights proteins in infection kolhapur