राज्यासमोर ठेवला आदर्श, कोरोना संकटातही भरली शाळा...........कुठे, कशी ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

पालक आणि विद्यार्थ्यांना विश्‍वासात घेत शाळा सुरू करून इतर शाळांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

कोल्हापूर : कोरोनाचे संकट, ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह, शासन आदेशातील संभ्रम या सर्वांत अडकून न पडता सर्वोतोपरी खबरदारी घेत जिल्ह्यातील पहिली शाळा सुरू झाली आहे. तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झालेल्या या शाळेचे नाव आहे मोहरे हायस्कूल आणि कै. सर्जेराव मोरे ज्युनिअर कॉलेज मोहरे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर). 

एकूण 405 विद्यार्थी आणि साडेचार एकरांत पसरलेल्या शिक्षण संकुलाने कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व ती दक्षता घेतली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांना विश्‍वासात घेत शाळा सुरू करून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इतर शाळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

जगासह देशावर, राज्यावर व जिल्ह्यावर कोरोनाचे संकट आले आहे. शाळा 22 मार्चपासून बंद आहेत. विद्यार्थी घरात आहेत. टप्प्याटप्प्याने शाळांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर मागील सत्रांचे गुण विचारात घेऊन निकालही लावण्यात आले. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत.
मात्र, या सर्व वादात न अडकता मोहरे येथील मोरे हायस्कूलने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा सुरू करण्यापूर्वी 15 दिवस अगोदर शाळा, वर्गखोल्या व बेंच निर्जंतुकीकरण करून घेतले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क वापरावेत, यासाठी प्रबोधन सुरू असून, संस्थेनेच मास्कचे वाटप केले आहे. शाळेत गर्दी होऊ नये, यासाठी दोन सत्रांत शाळा सुरू आहे. प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी असे नियोजन करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. 

      अशी घेतली जातेय खबरदारी 

  • दोन सत्रांत वर्ग सुरू 
  • शाळा, पालक, विद्यार्थी संवाद 
  • शाळा सुरू करण्यापूर्वी निर्जंतुकीकरण 
  • पालक व शाळा व्यवस्थापन समिती बैठक 
  • लाऊडस्पिकरद्वारे मास्कबाबत जागृती 
  • शाळेत हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन 
  • एका बेंचवर एक विद्यार्थी 
  • शिक्षक, विद्यार्थी आरोग्य तपासणी 

 
ऑनलाईन शिक्षण देण्यात अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात ना इंटरनेट आहे, ना अँड्रॉईड मोबाईल. सध्या पोटाचाच प्रश्‍न मोठा असल्याने मोबाईल रिचार्ज मारणार कोण? ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. त्यातूनही कोरोनाच्या जाण्याचा निश्‍चित कालावधी असता तरीही हे शिक्षण चालले असते. मात्र, कोरोनासह जीवनशैली ठेवावी लागणार असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. संस्था, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांच्या एकमताने व कोरोनाची योग्य ती खबरदारी घेऊन गेली तीन आठवडे शाळा सुरू आहे. 
- प्रा. शिवाजी मोरे, संस्थापक तथा जिल्हा परिषद सदस्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The school bell rang; in which village of kolhapur district Read