खासगी क्‍लासेसना अद्याप ग्रीन सिग्नल नाहीच

गणेश शिंदे
Wednesday, 13 January 2021

मार्चपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले. यानंतर टप्प्याटप्प्याने ते पूर्वपदावर आले. नववीपासूनचे वर्ग सुरू झाले.

जयसिंगपूर : मार्चपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले. यानंतर टप्प्याटप्प्याने ते पूर्वपदावर आले. नववीपासूनचे वर्ग सुरू झाले. पाचवीपासून आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, खासगी क्‍लासेसना अद्याप शासनाने ग्रीन सिग्नल दिला नसल्याने शहरातील 38, तर शिरोळ तालुक्‍यातील 82 खासगी क्‍लासचालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

जयसिंगपूरकडे शिक्षणनगरी म्हणून पाहिले जाते. शिरोळ तालुक्‍यासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या विविध भागांतून विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने शहरात येतात. एका शिरोळ तालुक्‍यातील जवळपास 27 गावांतील विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांतील शिक्षणासाठी येत असतात. शहरातील अनेक उच्चशिक्षित नोकरीच्या मागे न लागता ज्ञानाच्या जोरावर शहरात अनेक वर्षांपासून खासगी क्‍लास चालवितात. गुणवत्तेच्या बळावर त्यांनी आपल्या क्‍लासचा नावलौकिकही मिळवला आहे. 

मुले शाळेत जातात, तरीही पालकांनी त्यांना खासगी क्‍लास लावले आहेत. शहरात जवळपासून 38 खासगी क्‍लासच्या माध्यमातून विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अन्य शिक्षकांनाही क्‍लासला जोडून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न यातून सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. अनेक वर्षांपासून शिक्षक भरती नसल्याने उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराचा हा एक चांगला मार्ग खासगी क्‍लासच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. मात्र, कोरोनामुळे मार्चपासून खासगी क्‍लास बंद आहेत. 

शासनाने नववीपासूनचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पाचवीपासून लवकरच वर्ग सुरू होण्याच्या हालचाली सुरू असताना खासगी क्‍लासना मात्र शासनाकडून सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. शिक्षकांसह नॉन टीचिंग स्टाफमधील अनेकांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला. खासगी क्‍लासच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याचा मार्ग उपलब्ध झाला असला तरी लॉकडाउननंतर क्‍लासचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असून, अद्याप शासनाला त्यांच्या व्यथा समजल्या नाहीत, हेच दुर्दैव म्हणावे लागेल. 

मग आमच्यावरच का अन्याय? 
मद्याच्या दुकानांपासून सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. आम्हीही शासनाने जाहीर केलेल्या दक्षता घेऊन क्‍लास सुरू करण्यास तयार आहोत. मात्र, याला परवानगी मिळत नाही. आमच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला असून, शासनाला आमच्या व्यथा कळणार कधी, असा सवाल खासगी क्‍लासचालकांमधून विचारला जात आहे. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools Allowed But Injustice On Private Classes Kolhapur Marathi News