शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत 'इतक्या' जागा आहेत रिक्त...

संदीप खांडेकर
रविवार, 22 मार्च 2020

महाविद्यालयाला प्राचार्य असणे निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे ठरते. महाविद्यालयाशी संबंधित विकासकामांचे निर्णय तत्काळ घेता येतात.

कोल्हापूर -  शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित ११९ महाविद्यालयांत एक वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपद रिक्त आहे. प्रभारी प्राचार्यांवर महाविद्यालयीन कामकाज आटोपले जात असून, महत्त्वाचे निर्णय घेताना अडथळे येत आहेत. त्यातही सातव्या वेतन आयोगानुसार प्राचार्यांपेक्षा प्राध्यापकांचे वेतन अधिक असल्याने प्राचार्यपद स्वीकारायला नकारघंटा वाजवली जाते की काय, अशी शंका येऊ लागली आहे.

महाविद्यालयाला प्राचार्य असणे निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे ठरते. महाविद्यालयाशी संबंधित विकासकामांचे निर्णय तत्काळ घेता येतात. प्राचार्य महाविद्यालयाचा चेहरा म्हणून महाविद्यालयाची ओळख तयार करतो. शहरातील काही महाविद्यालये प्राचार्यांच्या नावाने आजही ओळखली जातात. त्यांनी दिलेल्या योगदानाचा तो परिणाम म्हणावा लागेल. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विचार करता २८८ पैकी ११९ महाविद्यालयांत एक वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपद रिक्त आहे. 

चाळीस महाविद्यालयांनी प्राचार्यपदाच्या भरतीकरिता जाहिराती दिल्या असून, त्यांच्याकडून प्राचार्यपदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. प्राचार्यपद रिक्त राहण्याला अनेक कंगोरे असल्याचे सांगण्यात येते. संस्थेने जाहिरात देऊनही पात्र उमेदवार न मिळणे, संस्थाचालकांच्या मनासारखा प्राचार्य न मिळणे अथवा प्राचार्यांना असलेला कामकाजाचा अधिक भार ही कारणे सांगण्यात येत आहेत. दुसरीकडे, प्रभारी प्राचार्य महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नसल्याने महाविद्यालयाच्या विकासाचे काम गतीने होऊ शकत नाही. प्रभारी प्राचार्यांनी अधिकारांचा वापर करून निर्णय घेतला तर अंमलबजावणीचे काय, असा प्रश्नही आकाराला येतो. सातव्या वेतन आयोगानुसार प्राचार्य व प्राध्यापकांच्या वेतनात फरक पडला आहे. प्राध्यापकांचे वेतन प्राचार्यापेक्षा वरचढ झाल्याने प्राचार्यपदाकरिता जाहिरात निघूनही काही प्राध्यापक या पदाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. पदासाठी पात्रता असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर व त्यानंतर प्रोफेसर होता येते. असोसिएट प्रोफेसरकडून प्रोफेसर होण्याकरिता अध्यापनाचा दहा वर्षांचा अनुभव, पीएच.डी. व १० रिसर्च पेपर नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध होणे आवश्‍यक असते. रिसर्च स्कोअर ११० असावा लागतो.

प्राध्यापक झाल्यानंतर लगेच प्राचार्यपद मिळाले तर त्याचा फायदा संबंधित प्राध्यापकाला मिळतो. एखाद्या प्राध्यापकांची सेवा पंचवीस वर्षे झाली असेल आणि त्यानंतर तो प्राचार्य झाला असेल तर प्राध्यापकापेक्षा कमी वेतन त्याला मिळते. त्याआधारे प्राध्यापकास १ लाख ९७ हजार ४८६ तर प्राचार्यास १ लाख ८० हजार ४६२ रुपये इतके वेतन मिळते. 
- प्राचार्य डॉ. धनाजी कणसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The seats of principal has been vacant in the colleges affiliated to Shivaji University

टॅग्स
टॉपिकस