
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने यंदा लोकवर्गणीतून होणारी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे रद्द केली. परिणामी, तब्बल सतरा वर्षानंतर महाराणी राधाबाई हायस्कूलचे (एमआर) मैदान दिवाळी सुटीत फुटबॉल स्पर्धेअभावी ओस पडले.
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने यंदा लोकवर्गणीतून होणारी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे रद्द केली. परिणामी, तब्बल सतरा वर्षानंतर महाराणी राधाबाई हायस्कूलचे (एमआर) मैदान दिवाळी सुटीत फुटबॉल स्पर्धेअभावी ओस पडले. यामुळे फुटबॉल शौकीन हिरमुसले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील संघाशी मुकाबला करण्याची संधी गेल्याने स्थानिक खेळाडूही नाराज झाले आहेत. गेले आठ महिने ठप्प असणारा हंगाम गडहिंग्लजच्या रूपाने सुरू होण्याची शक्यता मावळल्याने परगावचे संघही निराश झाले.
येथे दिवाळी सुटीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांची गेल्या अर्धशतकाहून अधिक काळाची पंरपंरा आहे. अजित क्रीडा मंडळाने साठच्या दशकात या आंतरराज्य स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. महागाईमुळे नव्वदच्या दशकात खंडित परंपरा युनायटेडने सन 2004 पासून सुरू केली. या स्पर्धेत सातत्य ठेवण्यासह देशाच्या फुटबॉलमधील प्रगत केरळ, गोवा, पंजाब, कर्नाटक, आध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यापर्यंत या स्पर्धा विस्तारात राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवली.
दरवर्षी गणेशोत्सव झाला की, राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीला सुरवात होते. ग्रामीण भागात कॉर्पोरेट पुरस्कर्ता नसल्याने प्रथम युनायटेडचे संचालक स्वतः वर्गणी घालून शौकीनांकडून मदत संकलनाला सुरवात केली जाते. शौकीनांची निस्वार्थी मदत आणि युनायटेडचे प्रामाणिक चिवट प्रयत्नांमुळे स्पर्धेची परंपरा टिकून आहे.
नामवंत संघाच्या सहभागामुळे कोल्हापूर, मिरज, बेळगाव येथूनही शौकीन सामने पाहण्यासाठी येतात. या निमित्ताने राष्ट्रीय संघाशी दोन हात करण्याची संधी संघांना गमवावी लागली. दरवर्षी या स्पर्धेनेच फुटबॉल हंगामाला सुरवात होते, ती थांबली आहे.
दिग्गज संघाचा सहभाग...
देशात मोठमोठ्या शहरात महागाईमुळे स्पर्धा इतिहासजमा होताना ग्रामीण भागात युनायटेडने गडहिंग्लजकरांच्या मदतीने चिकाटीने ही पंरपरा जोपासली आहे. नेटके नियोजन, स्टेडियमची बैठक व्यवस्था नसतानाही शौकिनांची होणारी तुडुंब गर्दी यामुळे भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च आयलिग स्पर्धा खेळणारे केरळचे स्टेट बॅंक त्रावणकोर (एसबीटी), गोकुलुम एफसी, बंगळुरचा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीईएमएल), गोव्याचा वास्को स्पोर्टस, स्पोर्टिंग क्लब, चैन्नयीन एफसी, मुंबईचा ऑईल ऍन्ड नॅचरल गॅस (आएनजीसी), पुणे फुटबॉल क्लब यासारख्या दिग्गज संघांनी व्यावसायिक अटी बाजूला सारत हजेरी लावून गडहिंग्लजच्या फुटबॉलप्रेमाला सलाम केला आहे.
संपादन - सचिन चराटी