सारथी संस्थेचे कामकाज मला पसंत नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

सारथी संस्थेचा मी काही अभ्यास केलेला नाही. पण एकूणच जे काही चाललं आहे, ते मला पसंत नाही. जे काही वाचायला मिळत आहे, ते देखील बरोबर नाही, असे सांगत सारथीच्या कामकाजावर खा.पवार यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

कोल्हापूर - सारथी संस्थेचे कामकाज ज्या पध्दतीने चालले आहे, ते मला पसंत नाही.तसेच संस्थेतील चुकीच्या गोष्टाला पांघरुन घालणारे लोकही चुकीचे वागत आहेत, असे आपले मत बनल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्‍त केले. हॉटेल पंचशील येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पुर्वी खा.पवार यांच्यावर निवेदनाचा अक्षरक्ष: पाउस पडला. 

खा.पवार म्हणाले, सारथी संस्थेचा मी काही अभ्यास केलेला नाही. पण एकूणच जे काही चाललं आहे, ते मला पसंत नाही. जे काही वाचायला मिळत आहे, ते देखील बरोबर नाही, असे सांगत सारथीच्या कामकाजावर खा.पवार यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान खा.पवार यांना आलेल्या निवेदनात सारथी संस्थेच्या स्वायत्ततेची मागणी करणारे निवेदनही यावेळी देण्यात आले. 

निवेदन देण्यासाठी विविध संघटनांची गर्दी 

सारथी संस्थेची स्वायत्तता बार्टी, यशदा तसेच अन्य संस्थाप्रमाणे कायम ठेवावी. संस्थेचे काम पूर्वीप्रमाणे सुरु व्हावे, मराठा समाजाच्या दुर्बल घटकांपर्यंत पोहचण्यासाठी निधी व पुरेसे मनुष्यबळ द्यावे, सारथी संशोधक, प्रशिक्षणार्थी यांची शिष्यवृत्ती त्वरित सुरु करावी. गेली अनेक वर्षे बार्टीचे व्यवस्थापन उत्तमपणे सांभाळणारे व्यवस्थापकीय संचालक डी.आर.परिहार यांची सारथीत पुर्ननियुक्ती करावी, अशी विनंती सकल मराठा समाजातर्फे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आणि मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी खा.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे दिले. यावेळी शिवाजी विद्यापीठातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते. 

वाचा - चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला : शरद पवार

संत राहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळातर्फे काही कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची काही रक्‍कम थकीत आहे,त्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली.हे निवेदन अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाकडून देण्यात आले. अपंग कल्याण आयुक्त या पदावर बालाजी मंजुळे या दिव्यांग आय.ए.एस अधिकाऱ्याची पुन्हा नेमणूक करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. भूविकास बॅंकेच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना देय रकमा मिळालेल्या नाहीत या मागणीसह इतरही काही मागण्या भू-विकास बॅंकेच्या ज्येष्ठ कर्मचारी संघटनेने केल्या. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar say I do not like the functioning of the Sarathi organization Sharad Pawar