शरद पवार आज कोल्हापुरात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

श्री.पवार गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार आहेत. तेथून हॉटेल पंचशील येथे काही काळ विश्रांती घेऊन ते तपोवन मैदानात होत असलेल्या एस. टी. कर्मचारी संघटनेच्या राज्य अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज कोल्हापुरात येत आहेत. एस. टी. कर्मचारी संघटनेच्या राज्य अधिवेशनाचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय ते राष्ट्रवादीच्या प्रमुख १५० कार्यकर्त्यांशी हॉटेल रेसिडेन्सी क्‍लब येथे संवाद साधणार आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

श्री.पवार गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार आहेत. तेथून हॉटेल पंचशील येथे काही काळ विश्रांती घेऊन ते तपोवन मैदानात होत असलेल्या एस. टी. कर्मचारी संघटनेच्या राज्य अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना रेसिडेन्सी क्‍लब येथे राष्ट्रवादीकडून स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री. पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत देशभर गाजत असलेल्या एनआरसी व सीएए या विषयावर संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना कानपिचक्‍या मिळण्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे.

वाचा - शहराच्या विकासाठी तुम्हाला काय वाटते ? 

या कार्यक्रमात माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, मानसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजू लाटकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, महापालिका व नगरपालिकांचे सदस्य, बाजार समिती, पंचायत समितीचे पदाधिकारी व पक्षाचे प्रमुख दीडशे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम खासगी स्वरुपाचा असल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले. श्री. पवार येथून शुक्रवारी सकाळी नऊ वाजता साताऱ्याकडे रवाना होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar today in Kolhapur