रायगडावर आज शिवराज्याभिषेकदिन सोहळा

 Shiv Rajyabhishek Din ceremony at Raigad today
Shiv Rajyabhishek Din ceremony at Raigad today

रायगड : दुर्गराज रायगडावर पसरलेला सन्नाटा, नगारखान्यात रात्री मिणमिणत्या पणत्या अन्‌ अचानक गगनाला भिडलेला "तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय,' हा जयघोष. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीच्या मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या हजेरीत गडपूजनाने नटलेला कार्यक्रम आणि त्याला चढलेला आनंदोत्सवाचा साज. शिरकाई देवीच्या गोंधळाने भक्तीचा स्वर शांत वातावरणात अलगद मिसळला व गडाचा कोपरा न कोपरा रोमांचित झाला. निमित्त होते शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमांचे. 
दरम्यान उद्या (ता. 6) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने होत आहे. 
यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे. मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या हजेरीत तो होत आहे. कोल्हापूरहून समितीचे कार्यकर्ते रायगडावर आज सायंकाळी पोचले. दरवर्षी गडावर लाखो शिवभक्तांची गर्दी असते. यंदा ती उणीव प्रकर्षाने जाणवली. 
आज सायंकाळी नगारखाना येथे समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या हस्ते गडपूजन झाले. प्रवीण हुबाळे व सत्यजित आवटे यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. मशालीच्या उजेडात रात्री शिरकाईदेवीचा गोंधळ झाला. यावेळी माजी नगरसेवक विनायक फाळके, वरुण भामरे, संजय पोवार, प्रवीण हुबाळे, सत्यजित आवटे, राहुल शिंदे, सागर दळवी, प्रवीण पोवार, अमर पाटील, सोमनाथ लांबोरे, योगेश केदार, दयानंद हुबाळे, श्रीकांत शिराळे, अमर जुगर, दीपक सपाटे, विश्वास काशीद उपस्थित होते. 


मेघडंबरीची सजावट 
युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यंदाही पायी गडावर आले. त्यांच्यासोबत मोजकेच कार्यकर्ते होते. या कार्यकर्त्यांनी रात्री मेघडंबरीची सजावट केली. 

कोरोना योद्धांचा होणार सन्मान 
कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी कोरोना योद्धे जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यांचा राजसदरेवरून सन्मान करण्यात येणार असून कोरोना योद्धा प्रमाणपत्र त्यांना समर्पित केले जाणार आहे. या योद्‌ध्यांना ते ई-मेलद्वारे पाठवले जाणार आहे. 

आज असा होणार सोहळा : 
- ध्वजपूजन व ध्वजवंदन, स्थळ : नगारखाना 
- युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह राजसदरेवर आगमन 
- युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक 
- मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक 
- युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन 
-युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह जगदीश्वराचे दर्शनासाठी प्रस्थान 
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com