शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागा बद्दल प्रश्‍नचिन्ह : सामान्यज्ञानावर प्रश्‍न कसे?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

विद्यार्थ्यांचा सवाल;  सराव परीक्षेत अजब कारभार

कोल्हापूर : ज्या अभ्यासक्रमाची परीक्षा असते त्याच्या सराव परीक्षेलाही त्याच अभ्यासक्रमाचे प्रश्‍न असतात; मात्र शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पहिल्यांदाच अंतिम वर्षाच्या सराव परीक्षेला सामान्यज्ञानावरचे प्रश्‍न असणारी प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना पाठवून वेगळेच उदाहरण दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांमधूनही याबाबत प्रश्‍न विचारले जात असून परीक्षा विभागाच्या अजब कारभाराबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा, त्यासाठी वापरली जाणारी संगणक प्रणालीची माहिती व्हावी, यासाठी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्याचे विद्यापीठाचे निश्‍चित केले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर व ई-मेल आयडीवर लिंक पाठवली. या लिंकमधील प्रश्‍नपत्रिकेत काही प्रश्‍न मराठीतून तर काही इंग्रजीमध्ये होते. विषयाच्या बाहेरचे प्रश्‍नही विचारले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ही सराव परीक्षा होती त्यामुळे सामान्यज्ञानावर आधारित प्रश्‍न होते. म्हणून ते मराठी आणि इंग्रजी भाषेत असल्याची सारवासारव परीक्षा विभागाने केली.

मात्र यावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुळात सराव परीक्षा ही अभ्यासक्रमानुरूप असते. ज्या अभ्यासक्रमाची परीक्षा आहे त्यावर आधारितच प्रश्‍न अपेक्षित असते. त्यातही विज्ञान, अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक शाखांची परीक्षा इंग्रजीमधूनच असते. असे असताना मराठीतून प्रश्‍न देण्याची गरज काय, असाही प्रश्‍न होत आहे. दरम्यान आजही सराव परीक्षा घेण्यात आली असून त्यामध्ये गोंधळ झालेला नाही.

तक्रार निवारण 
ऑनलाईन परीक्षेसंदर्भात विद्यापीठाने निर्माण केलेल्या विशेष कॉल सेंटरमार्फत दिवसभरात सुमारे २७०० विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. पी.आर.एन. क्रमांकांसंदर्भात सुमारे १५०० विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर केल्या. त्याचप्रमाणे मोबाईल रेंजच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना पासवर्ड प्राप्त होत नव्हते, ते उपलब्ध करून दिल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

परीक्षा पद्धती, संगणक प्रणालीची माहिती होण्यासाठी जरी सराव परीक्षा असली तरी ती अभ्यासक्रम किंवा विषयनिहायच झाली पाहिजे. विषयाशी संबंधित नसणारे प्रश्‍न जर असतील संभ्रम निर्माण होतो. गोंधळाची मानसिकता ठेवून परीक्षेला सामोरे जाणे अवघड असते. याची परीक्षा विभागाने जाणीव ठेवणे आवश्‍यक आहे.
- ऋषिकेश माळी (विद्यार्थी)

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivaji university Student question Strange handling in practice exam