शिवराज्याभिषेक दिन आता स्वराज्य दिन म्हणून साजरा होणार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

ग्रामविकास विभागातर्फे त्या दिवशी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवी गुढी उभारली जाणार असून, राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारतर्फे यंदापासून 6 जून अर्थात शिवराज्याभिषेक दिन "स्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागातर्फे त्या दिवशी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवी गुढी उभारली जाणार असून, राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाचे विविध घटकांतून स्वागत झाले, शिवाय महाविकास आघाडी सरकारचे हे स्तुत्य पाऊल असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. 

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे गेली काही वर्षे दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. हा दिन राष्ट्रीय सण व लोकोत्सव व्हावा, अशी भूमिका त्यांनी घेतली. या पार्श्‍वभूमीवर सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. शिवराज्याभिषेक दिन "स्वराज्य दिन' म्हणून साजरा होणार असून, शिवछत्रपतींचा देदीप्यमान व तेजस्वी इतिहास नव्या पिढीला समजणार असल्याची भावना इतिहास संशोधक, अभ्यासक, नागरिकांत निर्माण झाली आहे. 

 
ही आनंदाची बातमी आहे. शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, अशी आमची मागणी 2007 पासून आहे. रायगडावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, असेही आमचे म्हणणे आहे. ग्रामविकास विभागाने शिवराज्याभिषेक दिन स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. हा दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, या आमच्या भूमिकेचा हा पहिला टप्पा मानावा लागेल. 
- युवराज संभाजीराजे छत्रपती, खासदार 

स्वराज्य दिन म्हणजे भूमिपुत्रांचे स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र व सार्वभौम स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या चरित्रातून आदर्श घेऊन शिवराज्याभिषेक दिन स्वराज्य दिन म्हणून साजरा होणे चांगली बाब आहे. स्वराज्य केवळ एका जातीचे व धर्माचे नाही. ते सर्वांचे आहे, असाच त्याचा अर्थ आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन. 
- डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक 

सहा जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवरायांनी सार्वभौम राज्याची स्थापना करून इथल्या रयतेला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. आज सहा जून स्वराज्य दिन म्हणून साजरा होणार, ही अभिमानाची बाब आहे. "स्वराज्य दिन' याला व्यापक अर्थ आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे यातून उदात्तीकरण होत आहे. 
- डॉ. रमेश जाधव, इतिहास संशोधक 

हे पण वाचाVideo -कोल्हापूरच्या दूधगंगा उजव्या कालव्यात पडले गवे

 

शिवराज्याभिषेक दिन स्वराज्य दिन म्हणून गावागावात साजरा होणार, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. मराठा महासंघ गेली अनेक वर्षे शिवराज्याभिषेक दिन साजरा करत आहे. या निर्णयाच्या माध्यमातून गावागावांत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार असल्याने शिवछत्रपतींचा इतिहास नव्या पिढीलाही समजणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. 
- वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivrajyabhishek Din will now be celebrated as Swarajya Din

टॉपिकस
Topic Tags: