पुणे, मुंबईतील शूटिंग कोल्हापुरात? 

संभाजी गंडमाळे
Monday, 27 April 2020

 सव्वा महिन्याच्या लॉकडाउनमुळे मनोरंजन क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. मुंबई आणि पुणे येथील लॉकडाउन वाढण्याची शक्‍यता असल्याने आता शूटिंगसाठी कोल्हापूरलाच अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ही संधी घेऊन केवळ कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण इंडस्ट्रीची स्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

कोल्हापूर :  सव्वा महिन्याच्या लॉकडाउनमुळे मनोरंजन क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. मुंबई आणि पुणे येथील लॉकडाउन वाढण्याची शक्‍यता असल्याने आता शूटिंगसाठी कोल्हापूरलाच अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ही संधी घेऊन केवळ कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण इंडस्ट्रीची स्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात यश आले आणि येथील लॉकडाउन संपले तर मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून शूटिंगची शेड्यूल येथे लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, लॉकडाउन संपले तरी योग्य ती खबरदारी घेऊनच शूटिंग करण्याची ग्वाही संबंधित निर्माते आणि निर्मिती संस्थांनी दिली आहे. 

लॉकडाउननंतरच्या आठवड्यानंतर विशेषतः टीव्ही मालिकांच्या प्रसारणातील अडचणी वाढत गेल्या. कारण अनपेक्षितपणे आलेल्या या संकटामुळे शूटिंग बॅंक तशी फारशी कुणाकडेच तयार नव्हती. साहजिकच काही वाहिन्यांवर जुन्या मालिकांचे प्रसारण, तर काही वाहिन्यांवर चालू असलेल्या मालिकांच्याच जुन्या भागांचे प्रसारण सुरू झाले. मात्र, या पार्श्‍वभूमीवरही कलाकार आणि तंत्रज्ञांच्या रोजगाराचा प्रश्‍न गंभीर बनू लागला आहे. कोल्हापूर शहर आणि परिसराचा विचार केला तर येथे तीन मालिकांचे शूटिंग सुरू आहे. त्याशिवाय मुंबई आणि पुणे परिसरात सुरू असलेल्या मालिकांचे शूटिंग कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कारण तूर्तास या भागातील लॉकडाउन लवकर संपेल, अशी स्थिती नाही. मात्र, तेथील शूटिंग कोल्हापुरात आणायचे झाल्यास संबंधित निर्मिती संस्थांना सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नेमके नियोजन कसे करता येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी विविध वाहिन्यांचे निर्माते आणि "ओटीटी' प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिजचे, सिनेमांचे निर्माते अशा सर्व घटकांशी चर्चा सुरू झाली आहे. 

कोल्हापूरला पोषक वातावरण... 
काही वर्षात कोल्हापुरात शूटिंगला प्राधान्य मिळू लागले आहे. कारण येथील निर्मिती खर्च कमी आहे आणि तुलनेत येथील अनुभवी तंत्रज्ञ व कामगारांची संख्याही मोठी आहे. पुणे आणि मुंबईतील लॉकडाउन कायम राहण्याची शक्‍यता आहे आणि कोल्हापुरातील लॉकडाउन संपेल, अशी स्थिती निर्माण झाली तर कोल्हापूरच निर्मिती संस्थांना योग्य "ऑप्शन' राहणार आहे. 

ऐन हंगामात शूटिंग बंद राहिल्याने कामगार व तंत्रज्ञांसाठी हाताला काम ही सध्याची गरज आहे. त्यामुळे शूटिंगसाठी येथे काही निर्मिती संस्था व वाहिन्या आल्या तर सर्वतोपरी सहकार्य करावे लागणार आहे. एकूणच परिस्थिती पहाता सर्व "पेमेंट' लगेचच मिळेल, असेही नाही. परंतु, किमान काही पैसे काम होताच मिळतील आणि आर्थिक कोंडी कमी होईल, असे वाटते. 
- सचिन जाधव, लाईटमन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shooting in Pune, Mumbai in Kolhapur?

टॉपिकस
Topic Tags: