esakal | वीज ठेकेदारांना मजूरांचा "शॉक'
sakal

बोलून बातमी शोधा

Shortage Of Labor To Power Contractors Kolhapur Marathi News

आपत्तीमध्ये नुकसान झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने दुरूस्तीची कामे हाती घ्यावी लागतात. त्यासाठी ठेकेदारांकडून काम करून घ्यावे लागते.

वीज ठेकेदारांना मजूरांचा "शॉक'

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : आपत्तीमध्ये नुकसान झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने दुरूस्तीची कामे हाती घ्यावी लागतात. त्यासाठी ठेकेदारांकडून काम करून घ्यावे लागते. परंतु, लॉकडाऊनमुळे कामे ठप्प झाल्याने ठेकेदारांकडे असणारे परप्रांतीय मजूर आपापल्या गावाकडे परतलेत. आता भविष्यात महापुराचे संकट उभे ठाकण्याची भिती असून त्यात होणाऱ्या नुकसानीची दुरूस्ती कामगारांअभावी रेंगाळण्याची भिती आहे. यामुळे येणाऱ्या आपत्तीशी सामना करण्याचे आव्हान महावितरण कंपनीसमोर असणार आहे. 

वादळी वारा, चक्रीवादळ, महापूर, आग आदी आपत्तीप्रसंगी वीज महावितरण कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होवून वीज पुरवठा खंडीत होते. यामुळे उपलब्ध ठेकेदाराकडून तातडीने काम करून घेत वीज पुरवठा सुरळीत केला जातो. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात वीजेची कामे करणारे दहा ठेकेदार आहेत.

या ठेकेदारांकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या परप्रांतीयांसह राज्यातील यवतमाळ जिल्हा व काही स्थानिक मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे सर्व कामे ठप्प झाली. यामुळे परप्रांतीय मजूर आपापल्या गावाकडे रवाना झाले. ते परत कधी येतील याची शाश्‍वती नाही. चक्रीवादळावेळी जोरदार वाऱ्याने काही ठिकाणी नुकसान झाले. त्यावेळी हे काम करण्यासाठी मजूर टंचाईचा प्रश्‍न समोर आला. स्थानिक व कंपनीच्या कामगारांकडूनच ही कामे कशीबशी करून घेतली. 

दरम्यान, आता महापूराचे संकट समोर दिसत आहे. महावितरण कंपनीने आपत्तीशी लढण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे. परंतु महापुराच्या नुकसानीनंतर तातडीने करणे आवश्‍यक असणारी कामे मजुराअभावी वेळेत होतील की नाही याची धास्ती ठेकेदारासह महावितरणलाही आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी आजच आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही समस्या मांडली. त्यावेळी आमदार पाटील यांनी स्थानिक मजूरांना घेवून कामे करून घेण्याच्या सूचना दिल्या. परंतु, स्थानिक कामगारही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मिळत आहेत.

तसेच ही अवजड कामे करण्यात परप्रांतीयांचा असणारा हातखंडा स्थानिक कामगारांना येईल काय, हाही प्रश्‍न आहे. यामुळे आपत्तीवेळी ज्या गतीने काम होणे अपेक्षित असते ते वेळेत पूर्ण होण्यावर परिणाम जाणवणार आहे. परिणामी ठेकेदारांना मजुर टंचाई तर भासणारच आहे, यापेक्षाही अधिकचे आव्हान महापुराच्या कालावधीत महावितरण कंपनीला पेलावे लागण्याची चिन्हे आहेत. 

महावितरणची सतर्कता... 
महावितरण कंपनीने आपत्तीमध्ये ऐनवेळी लागणाऱ्या आवश्‍यक साहित्याचा साठा करून ठेवला आहे. त्यात ट्रॉन्सफॉर्मर 50, पॉवर ट्रान्सफॉर्मर एक, सिमेंट पोल 50, लोखंडी पोल 30, केबल, कंडक्‍टर आदी साहित्याचा समावेश आहे. गतवर्षी अचानक आलेल्या महापुरामुळे पाच उपकेंद्रे बंद पडली होती. हा अनुभव गृहीत धरून उपकेंद्रे कशामुळे बंद पडतात याचा अभ्यास करून यंदा उपविभागातील सर्व 23 उपकेंद्रेसुद्धा देखभाल दुरूस्ती करून सज्ज ठेवली आहेत.