सायबर गुन्हे विश्‍लेषण कोल्हापुरात...

शिवाजी यादव
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

गुन्ह्यात वापरलेली माहिती तंत्रज्ञान साधने व प्रणालीचा वापर कसा केला? हे शोधण्याची नवी सुविधा कोल्हापुरातील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोन महिन्यांत येथे होणार आहे.

कोल्हापूर - माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्या संबंधित गुंतागुंतीचे गुन्हेही घडतात. तपास त्या त्या गुन्ह्यानुसार होतो. अशा गुन्ह्यात वापरलेली माहिती तंत्रज्ञान साधने व प्रणालीचा वापर कसा केला? हे शोधण्याची नवी सुविधा न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोन महिन्यांत येथे होणार आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे विश्‍लेषण तत्काळ होऊन गुन्हे उघडकीस आणणे, पुरावे वेळेत जमा करून गुन्हा शाबीत होण्याचे प्रमाण वाढवण्यास मदत होणार आहे, अशी माहिती प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. नितीन चुपके यांनी ‘सकाळ’शी बोलताना 
दिली.

न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा ; सायबर गुन्हा अन्वेषणला गती शक्‍य

बॅंकेच्या खात्यावर अज्ञाताकडून पैसे काढले जातात, कोणाचे ई मेल खाते हॅक होते, अश्‍लील चित्रफित बनवून व्हायरल केली जाते. किंवा ॲनिमेशनद्वारे एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र बदनामी होईल, अशा पद्धतीने व्हायरल केले जाते. यापासून ते नोकरीचे आमिष दाखवणे, भेटवस्तू देण्याचा बनाव केला जातो. पासवर्ड चोरून गैरवापर केला जातो. महत्त्वाची माहिती हॅकिंगद्वारे चोरली जाते. अशा प्रकारचे गुन्हे तीन-चार वर्षांत वाढले आहेत. त्याच्या तपासासाठी पोलिसांकडे सायबर सेलची स्वतंत्र यंत्रणा जरूर आहे. मात्र माहिती तंत्रज्ञानात सतत होणारे बदल किंवा नवनवीन प्रणाली येत आहेत. त्यामुळे सायबर सेलच्या तपासावर मर्यादा येतात. हीच बाब विचारात घेऊन सायबर गुन्ह्याचा तपास सखोलपणे करण्यासाठी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत सायबर गुन्ह्याचे विश्‍लेषण होणार आहे.

वाचा - अहो दादा... हे सार्वजनिक शौचालय आहे की शुटिंगचा सेट...?

दोन वर्षांत ४५०० नमुने तपासले

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील तपास कामाचे विश्‍लेषण करण्याचे काम या प्रयोगशाळेकडे होते. राज्यभरात ४५ मोबाईल व्हॅन आहेत. त्याद्वारेही घटनास्थळी जाऊन विश्‍लेषण करणे तसेच परिस्थितीजन्य पुरावा संकलित करण्याचे काम केले जाते. दोन वर्षांत जवळपास ४ हजार ५०० नमुने प्रयोगशाळेत तपासले गेले आहेत, असेही डॉ. चुपके यांनी सांगितले.

अशी असेल प्रयोगशाळा

  •  प्रयोगशाळेत स्वतंत्र लॅब 
  •  चार संगणक व माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ
  •  तपास पूरक यंत्र साधनसामग्री
  •  विषारी द्रव प्यालेल्या मृताचा व्हिसेरा तपासणी 
  •  जनुकीय अभ्यासाद्वारे रक्ताचे नमुने तपासणी
  •  सामान्य शास्त्रात -इंधन व अन्नातील भेसळ शोधणे

सायबर गुन्ह्यांच्या तपासात मोबाईल संभाषण आवाज कोणाचे आहेत? किती वयाच्या व्यक्तींचा आवाज आहे, आवाजातील कंपनांवरून ती व्यक्तींच्या स्वभावापर्यंतचे विश्‍लेषण होईल (टेप ॲथोन्टी पिकेशन व स्पिच ॲडंटीफिकेशन) ही माहिती तपासाला पूरक ठरू शकेल यातून तपास पूर्ण होऊन न्यायालयात खटला उभा करण्यास मदत होईल.
 - डॉ. नितीन चुपके, 
प्रयोगशाळा, उपसंचालक   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siber crim analysis in kolhapur marathi news