मार्गदर्शक अटी घाला, पण  व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या...गडहिंग्लजला मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या येथील हॉटेल व्यावसायिकांनी आज मूक मोर्चा काढला. दंडाला काळ्या फिती लावून आणि हातात लक्षवेधी फलक उभारुन आपल्या भावना मांडल्या.

गडहिंग्लज : लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या येथील हॉटेल व्यावसायिकांनी आज मूक मोर्चा काढला. दंडाला काळ्या फिती लावून आणि हातात लक्षवेधी फलक उभारुन आपल्या भावना मांडल्या. शासनाने अन्य व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे मार्गदर्शक अटी घालून हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. 
गडहिंग्लज शहरात सुमारे 80 हॉटेल्स व 35 चहा गाडे आहेत. व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्यातून होत आहे. आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज मूक मोर्चा काढाला. 

सकाळी अकराला सर्व व्यावसायिक नगरपालिकेच्या प्रांगणात जमले. तेथून प्रांत कार्यालयाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आले. नगरसेवक महेश उर्फ बंटी कोरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून मूक मोर्चाला सुरवात झाली. दसरा चौकातून मुख्य मार्गावरुन मोर्चा वीरशैव चौकात गेला. तेथून पुन्हा पालिकेच्या प्रांगणात आला. आमचं हॉटेल आमचा आधार-धोक्‍यात आहे आमचा परिवार, सरकारनं एकच सांगावं-असं किती दिवस चालावं, आमचं पोट कोण भरणार-अजून असं किती दिवस चालणार यासह विविध मजकूराचे लक्षवेधी फलक व्यावसायिकांनी उभारले होते. डोकीवर गांधी टोपी व हाताच्या दंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या. 

कोरी म्हणाले, ""लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. शासनाने व्यावसायिकांच्या अडचणी समजून घ्याव्यात. किमान मार्गदर्शक अटी घालून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.'' हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अवधूत पाटील, उपाध्यक्ष सिद्धार्थ गाताडे, चहागाडा संघटनेचे अध्यक्ष नितीन पायमल, उपाध्यक्ष किरण पाटील, प्रकाश बाळीकाई, आण्णासाहेब गाताडे, सुनील तेली, प्रकाश आरभावी, रफिक मुल्ला, वैभव पाटील, दयानंद पाटील, अनिल नवाळे, झाकिर नदाफ, मनोज गाताडे, रामचंद्र येसरे, सचिन पायमल यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. 

जीवन मरणाचा प्रश्‍न... 
हॉटेल व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार, वीज बिल, गाळा भाडे, बॅंकेचा हप्ता यामुळे कर्जाचा बोजा वाढत आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या जीवन मरणाचा प्रश्‍न झाल्याने मायबाप सरकारने व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silent March Of Hoteliers In Gadhinglaj Kolhapur Marathi News