कर्ज काढून त्याने बनवल्या भीम गदा पण...

मतीन शेख
Saturday, 29 August 2020

कुस्ती स्पर्धा बंद; चांदी कारागीर चिंतेत

कोल्हापूर : कोरोना महामारीत चंदेरीनगरी हुपरीतील चांदी व्यवसायिक व कारागिरांना चिंतेने ग्रासले आहे. विविध दागिन्यांसह चांदीच्या भीम गदांना मागणी नसल्याने या गदा बनवणारा कुशल कारागीर बेरोजगार झाला आहे. कुस्ती मैदानात विजेत्या मल्लास ही गदा बक्षीस म्हणून दिली जाते; परंतु पाच महिन्यांपासून स्पर्धाच रद्द असल्याने गदांची मागणी ठप्प झाली आहे.

येथील चांदीच्या आभूषणांबरोबरच भीम गदांना विशेष मागणी आहे. इंगळी, रेंदाळात ही कलाकुसर करणारे कारागीर आहेत. कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांकडून विजेत्या मल्लांना मानाची गदा देण्याची परंपरा महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातही आहे. लॉकडाउनमुळे स्पर्धांवर बंदी आली. उन्हाळ्याचा कालावधी हा यात्रा-जत्रा वर्षाचा असतो. यात पारंपरिक कुस्तीची स्पर्धा होतात. आयोजकांनी आधीच गदांचे बुकिंग केले होते. व्यापारी कारागिरांनी मागणीप्रमाणे गदा तयार केल्या. परंतु या ऑर्डर रद्द झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रातल्या आखाड्यातील मल्लांचा शड्डू घुमणार कधी ? 

परतफेड करणेही अवघड
इंगळी गावचे नाझीम लतीप हे चांदी कारागीर आहेत. नक्षीदार रत्नजडित भीम गदा बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. महाराष्ट्रातील सांगली, मुंबई ते पुसद यवतमाळपर्यंत त्यांनी बनवलेल्या गदांना मागणी असते. अन्य राज्यांतही ते मागणीप्रमाणे गदा पोहोचवतात. यंदा कुस्तीचा हंगाम चांगला होईल आणि गदांची ऑर्डर येईल, या अपेक्षेने जानेवारीत त्यांनी गदांची निर्मिती केली. मार्चअखेर काही गदा विकल्या. परंतु, बाकी अजूनही पडून असल्याचे ते सांगतात. यातून काही पैसे मिळतील आणि व्यवसाय वाढवता येईल या दृष्टीने त्यांनी कर्ज घेतले होते. परंतु त्याची परतफेड करणेही अवघड 
झाले आहे.

राज्यातील हुपरी, इंगळी येथून आम्ही कुस्ती स्पर्धेसाठी गदा मागवतो. गदांची कलाकुसर, चकाकी, चांदीचा दर्जा चांगला असतो. सध्या स्पर्धा रद्द असल्याने आम्ही ऑर्डर केली नाही.
- सोनू सिंग, पंजाब

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silver traders and artisans affected by Corona epidemic in Hupari