रंकाळ्याच्या कठड्यावर बसण्याची हौस आतातरी थांबणार का ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

ना सोशल डिस्टन्सिंग, ना कोणते नियम. ज्याला जी जागा सापडते तेथे बसण्याचा अट्टाहास. याच अट्टाहासामुळे महिन्याभरात रंकाळा टॉवर परिसरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत.

कोल्हापूर : सायंकाळी साडेपाच सहा वाजले की रंकाळयाच्या कठड्यावर बसण्यासाठी झुंबड सुरू होते. कोरोनासारख्या संकटकाळात ना सोशल डिस्टन्सिंग, ना कोणते नियम. ज्याला जी जागा सापडते तेथे बसण्याचा अट्टाहास. याच अट्टाहासामुळे महिन्याभरात रंकाळा टॉवर परिसरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. संख्या वाढत असताना आता तरी कठड्यावर बसणारे शहाणे होणारा का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

रंकाळ्यावरची सायंकाळी होणारी गर्दी काही कमी झाली नाही. दिवसभर उकाडा हैराण करतो असे कारण देत थोडावेळा तरी वाऱ्याला जाऊन बसावे या उद्देशाने गर्दी वाढत गेली. रंकाळा चौपाटी बंद असल्याने कठड्यावर गर्दी वाढत गेली. तीन महिन्यापासून कठड्यावर बसलेल्यांना हटविताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. सायंकाळी सहानंतर सायरन वाजवत पोलिस गाडी आल्यानंतर तेवढ्यापुरती धावपळ करायची. नंतर पुन्हा कठड्यावर गप्पांचे फड रंगवायचे ही सवयच काहींच्या अंगवळणी पडली. 

जुना वाशीनाक्‍यापासून ते तांबट कमान, पद्माराजे उद्यानासमोरील भाग, संध्यामठ, पुढे चौपाटीपर्यंतच्या कठड्यावर दिवसेंदिवस गर्दी वाढत गेली. कोरोनाच्या काळात गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवा असे आवाहन वांरवार गेले. त्यास प्रतिसाद मात्र कुणी दिला नाही. 
रंकाळा टॉवर याच कारणास्तव आता हॉटस्पॉट बनत चालला आहे. दुधाळी, जाऊळाचा बालगणेश मंदिर परिसर, रंकाळा तालीम, आयरेरक गल्ली, ताराबाई रोड असा दाटीवाटीचा हा परिसर आहे. पहिल्यांदा डॉक्‍टर, नंतर रिसेपनिस्ट कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर सावधानता बाळगणे गरजेचे होते. तरीही रंकाळ्याच्या कट्टयावर बसण्याची हौस काही कमी झाली नाही.

महिन्याच्या आत दोनवेळा परिसर सील करावा लागला. ज्या भागात पहिल्यांदा रुग्ण सापडला तो भाग आणि सध्या सील केलेले रंकाळा टॉवर येथील रस्ता हा हाकेच्या अंतरावर आहे. येथील इमारतीत दोन दिवसात तीन रुग्ण आढळले. एकाला कोरोना झाला आणि त्याच्या संपर्कात कोणी आले तर त्याला लागण होण्याचा धोका असतो. शहरात गेल्या आठवड्यापासून ज्या प्रमाणे कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे, तो निश्‍चितच चिंताजनक आहे. 

सतर्कता गरजेची... 
रंकाळ्याच्या कठड्यावर बसणारे लोक यातून तरी काही धडा घेतात का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोशल डिस्टन्स न ठेवता समुहाने गप्पा मारणे आता या परिसराला निश्‍चितच परवडणारे नाही. एकाच परिसरात पाच रुग्ण सापडल्याने स्थानिक लोकांना अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. 

दृष्टिक्षेप  
- सायंकाळी कडठ्यावर बसण्यासाठी झुंबड 
- दुधाळी, जाऊळाचा गणपती, ताराबाई रोडवर दाटीवाटीची वस्ती 
- महिन्याच्या आत दोनवेळा परिसर सील 
- इमारतीत दोन दिवसात तीन रुग्ण आढळले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to sit on the wall of Rankala stop soon?