व्यापाऱ्यांत धास्ती: चोरट्यांचे लक्ष्य आता मुख्य रस्त्यावरील दुकानांवरच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

गांधीनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ 
 

गांधीनगर : या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, आज पहाटे चोरट्यांनी गांधीनगर-चिंचवाड मुख्य रस्त्यावरील सहा दुकानांना लक्ष्य करून सुमारे साठ हजारांसह चांदीचे दागिने लंपास केले. वळिवडे गावच्या हद्दीतील दोन किराणा दुकान, मोबाईल दुकान, दोन हार्डवेअर दुकाने आणि एका ऑईलच्या दुकानात चोरी झाली. 

आज पहाटे तीन ते चार च्या दरम्यान चोरट्यांनी अशोक शेंडगे यांच्या साई समर्थ दुकानाचे शटर उचकटून ड्रॉव्हरमधील रोख 40 हजार रुपये घेऊन शेजारी असणाऱ्या इंद्रा मोबाईल दुकानाचे शटर उचकटून ड्रॉव्हरमधून दहा हजार रुपये व चांदीचे दागिने लंपास केले. तेथून काही अंतरावर असणाऱ्या संजय चव्हाण यांच्या हरिप्रिया सेल्स या बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाचा दरवाजा उचकटून 7 हजार रुपये लंपास केले. उमेश बजाजी यांच्या जीएसके हार्डवेअरमधून तीन हजार रुपये, तर अशोक चव्हाण यांच्या दत्त किराणा स्टोअर्समधून गुटखा लंपास केला. महालक्ष्मी लुब्रिकेंटसमध्ये चोरट्यांच्या हाताला काहीही लागले नाही. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. 

व्यापाऱ्यांत धास्ती 
काही दिवसांपूर्वी सरनोबतवाडीत चोरट्यांनी चार ते पाच बंगल्यांना लक्ष्य करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. तो तपास चालू असतानाच पुन्हा चोरीची घटना घडल्याने गांधीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six shops robbary in gandhinagr kolhapur