अजगरामुळे खोळंबली गवत कापणी

अशोक तोरस्कर
Tuesday, 24 November 2020

मुंगूस सापाची शिकार करते; मात्र अजगरानेही मुंगसाबरोबर झुंज देत त्याच्याभोवती विळखा घातला. या लढाईमध्ये अजगराची सरशी झाली.

उत्तूर : मुंगूस सापाची शिकार करते; मात्र अजगरानेही मुंगसाबरोबर झुंज देत त्याच्याभोवती विळखा घातला. या लढाईमध्ये अजगराची सरशी झाली. अजगराने मुंगसाला गिळून टाकले. बहिरेवाडी (ता. आजरा) येथील उत्तम पोरे यांच्या जखनी नावाच्या शेतात ही घटना घडली. यानंतर अजगर शेतातच पडून राहिले. इकडे शेतकऱ्यांची गवत कापणी खोळंबली. मग दोन दिवस वाट पाहून शेतकऱ्यांनी अजगराला वन विभागाकडे सुपूर्द केले आणि गवत कापणी उरकली. 

सध्या शेतातील गवत कापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिकारीच्या शोधात असणाऱ्या मुंगसाने अचानक अजगरावरच हल्ला केला. अजगरानेही मुंगसाला चांगलेच उत्तर देत त्याला विळखा घातला. मुंगसाने चपळाईने स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला; पण अजगराच्या तावडीतून ते सुटले नाही.

शेवटी अजगराने मुंगसाला गिळून टाकले. यानंतर अजगर दोन दिवस या ठिकाणी पडून राहिले. शेतकऱ्यांना या ठिकाणचे गवत कापायचे होते. त्यामुळे त्यांनी बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील सुधाकर सुतार यांच्याशी संपर्क साधला. बाळासाहेब धुमाळ, प्रकाश मोदर, संदीप जाधव, बाळासाहेब सावंत (सर्व रा. बेकनाळ) व अवधूत पोरे, सुहास चौगुले (रा. बहिरेवाडी) यांनी शेतातील आठ फूट लांबीच्या अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. सुधाकर सुतार यांनी यापूर्वी कात्रज (पुणे) येथे सर्प विद्यालयात काम केले आहे. त्यांनी अनेक सापांना व सरपटणाऱ्या प्राण्यांना जीवदान दिले आहे. 
 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake Disrupts Grass Harvesting Kolhapur Marathi News