दोन आठवड्यात बेळगावात देश-विदेशातून आले इतके लोक...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

९ मे पासून परराज्यातून बेळगावात येणाऱ्यांचा ओघ सुरू झाला. परराज्यातून आलेल्या सर्वांनी बेळगाव शहर व जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आपले गाव गाठले.

बेळगाव - गेल्या दोन आठवड्यात देश व विदेशातील १४ ठिकाणाहून ७६७ जणांचे बेळगावात आगमन झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. यापैकी सर्वाधिक म्हणजे ६०७ जण एकट्या महाराष्ट्र राज्यातून आले आहेत. ७६७ जनांपैकी ६७८ जनांचे संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले आहे. १० वर्षांपेक्षा कमी वयाचे, ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे, गर्भवती महिला तसेच आजारी मिळून २७ जणांना होम क्वारणटाईन करण्यात आले होते. ६२ जण पुन्हा आपल्या राज्यात परत गेले होते. होम क्वारणटाईन करण्यात आलेल्या २७ जणांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते. पण त्यांचे स्वॅब  शुक्रवारी घेऊन त्यांचेही संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले आहे.

सर्वाधिक महाराष्ट्रतून आले

९ मे पासून परराज्यातून बेळगावात येणाऱ्यांचा ओघ सुरू झाला. परराज्यातून आलेल्या सर्वांनी बेळगाव शहर व जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आपले गाव गाठले. जिल्ह्यापेक्षा बेळगाव शहरात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तब्बल ७६७ जण बेळगाव शहरात आले आहेत. त्यांची नोंद बेळगाव महापालिकेकडे आहे. बेळगावात आलेल्यांची ट्रॅव्हल हिस्टरी पाहता सर्वाधिक महाराष्ट्रतून आले आहेत. त्यापाठोपाठ गोवा, राजस्थान व गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. या राज्यातून येणाऱ्यांची संख्या व कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्याही वाढू लागल्यामुळे १८ मे रोजी या राज्यातून कर्नाटकात येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे या राज्यांमधून येणाऱ्यांची संख्या कमालीची घटली. शनिवारी दुपारपर्यंत तर एकाही व्यक्तीची नोंद सिपीएड मैदानावरील नोंदणी कक्षात झाली नव्हती. यामुळे महापालिका प्रशासनावरील ताण कमी झाला. ३१ मे पर्यंत ही प्रवेशबंदी कायम आहे.

वाचा - बेळगावात मुंबईहून आलेल्या महिलेला कोरोनाची बाधा...

गेल्या दोन आठवड्यात परदेशातून तीन व्यक्ती बेळगावात आल्या आहेत त्यांची नोंद पालिकेकडे आहे. दिल्ली, दादरा नगर हवेली व पोंडीचेरी या केंद्रशासित प्रदेशातून ही आठ जन बेळगावात आले आहेत. त्या सर्वांचेच संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले आहे. अगदी जम्मू काश्मीर तसेच हरियाणा व पंजाब येथूनही लोक आले आहेत. ये सर्वजण सेनादलातील जवान असल्याची माहिती मिळाली आहे.

या ठिकाणाहून आले बेळगावात ७६७ जण
महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, दादरा नगरहवेली, जम्मू काश्मीर, पोंडीचेरी, हरियाणा, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू व विदेश.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So many people came to Belgaum in two weeks