
गडहिंग्लज : घरची केवळ चार गुंठे शेती. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी वडिलांनी हमालीचा आधार घेतला. आईची शेतमजुरीतून संसाराला हातभार लावण्यासाठी धडपड. परंतु, आपल्या मुलाने अधिक शिकले पाहिजे यासाठी दोघांनी आयुष्यभर कष्टाचा डोंगर उपसला. पदवीने स्वप्नपूर्ती होणार, असे वाटत असतानाच तो शेवटच्या वर्षी अनपेक्षितपणे नापास झाला. हाच त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.
पालकांच्या मेहनतीशी प्रतारणा झाली म्हणून तो झपाटून स्पर्धा परीक्षेत केवळ उतरलाच नाही, तर करसहायक म्हणून दमदार सलामीही दिली. ही कहाणी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत करसहायक म्हणून निवड झालेल्या येथील बंडू शिवाजी गवळी या युवकाची.
येथील काळभैरी मार्गावरील गवळी वसाहतीत बंडूचे कुटुंब आहे. घरानजीक असणाऱ्या गडहिंग्लज हायस्कूलमध्येच बारावीपर्यतचे शिक्षण झाले. कुटुंबाचे रहाटगाडे चालविताना पालकांची होणारी दमछाक त्याला अस्वस्थ करायची. त्यासाठी शाळेच्या अगोदर गोठ्यात साफसफाई तर शाळा सुटल्यावर गुरे चरायला न्यायची हाच ठरलेला दिनक्रम. त्यानंतर वेळ मिळाला, तर पुस्तकावरून नजर फिरवायची. यामुळे शिक्षणातील प्रगती यथातथाच. परिणामी, दहावीला 60, तर बारावीला 56 टक्के अशी जेमतम वाटचाल झाली.
लवकर नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने येथील डॉ. घाळी महाविद्यालयात बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिस्ट्रेशनला (बीबीए) प्रवेश घेतला. शेवटचे वर्ष त्याच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. कारण, नापास झाल्याने पुढे काय या प्रश्नाने भंडावून सोडले. यापेक्षा पालकांनी शिक्षणासाठी उपसलेल्या कष्टामुळे तो बैचेन झाला. उत्तीर्ण झाल्यावर कोल्हापूरच्या प्री आएएस केद्रांत वर्षभर प्रशिक्षण घेतले. सध्या इस्लामपुरातील अकादमीत अभ्यास करतो आहे.
आई-वडिलांचे कष्ट....
वडिलांनी शेती कमी असल्याने बैलगाडीतून बाजारपेठेत साहित्य पोहचवायचे काम सुरू केले. टेंपो वाढल्याने या व्यवसायावर गंडातर आले. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या ओळखीतून हमाली सुरू केली. नारळ व्यापारी एस. एन. दड्डी यांच्याकडे गेल्या तीन दशकापासून ते काम करतात. बंडूच्या शिक्षणासाठी आई शाम्पला यांनीही काही कमी पडू नये, यावर नेहमाच कटाक्ष ठेवला. भाऊ राजकुमारने देखील शिक्षण थांबवून वडिलांना हमालीत मदत करीत त्याला प्रोत्साहन दिले.
उच्चपदासाठी तयारी करणार
नापास झाल्यानंतरच स्पर्धा परीक्षेकडे वळलो. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने अधिक आनंद झाला. खासकरून पालकांच्या कष्टाला न्याय देऊ शकलो याचे समाधान मोठे आहे. भविष्यात यापेक्षा उच्चपदासाठी चांगली तयारी करणार आहे.
- बंडू शिवाजी गवळी
संपादन - सचिन चराटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.