
कोल्हापूर : एकशे चाळीस वर्षापूर्वीचा स्वातंत्र्यपूर्व काळ. तालमीत गणेशमूर्ती नेण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड चाललेली; मात्र चौकट लहान असल्याने मूर्ती आत जाईना. मग तत्कालीन वस्तादांनी जणु हुकूमच सोडला. "तालमीची चौकट काढा...' असा तो हुकूम. त्यानंतर काही वेळातच मग कार्यकर्त्यांनी चौकट काढली आणि तालमीत मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली. शिवाजी पेठेतील या तटाकडील तालमीला मोठी परंपरा आहे. 1880 पासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. पण, केवळ गणेशोत्सवच नव्हे स्वातंत्र्यलढ्याबरोबरच शहराच्या एकूणच जडणघडणीत या तालमीचे योगदान मोठे राहिले आहे.
कुस्ती, म्हशींच्या शर्यती, कोंबड्यांची झुंज, बकऱ्यांच्या टकरी, कबुतरांच्या शर्यती आणि मर्दानी खेळाबरोबरच शहरात पूर्वी सोंगी भजन आणि संगीत मेळ्यांची मोठी परंपरा. साहजिकच गणेश विसर्जन मिरवणुकीतही सजीव देखाव्यांचा सुवर्णकाळ आणि या काळात तटाकडील तालमीचा दबदबाही अनुभवला आहे. तीस ते चाळीस बैलगाड्या या तालमीच्या मिरवणुकीत असायच्या आणि गॅसबत्तीच्या उजेडात मिरवणूक निघायची. सजीव देखाव्यातील सोंगंही तितकीच भारी असायची. ही सोंगं घेणाऱ्यांची हौसही इतकी भारी की महिन्यापूर्वीपासूनच त्यांची तयारी सुरू व्हायची.
सोंगासाठी आवश्यक दाढी-मिशा सर्व काही ओरिजनलच असलं पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह असायचा आणि या साऱ्यांना मेकअप करायला असायचे ते प्रसिद्ध अभिनेते गणपत पाटील. तालमीने सलग दहा वर्षे सजीव देखावा स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. तालमीची मर्दानी खेळाची परंपराही मोठी. मर्दानी खेळातील अनेक नामांकित वस्ताद आणि मावळे याच तालमीत तयार झाले. तालमीच्या इमारतीत दादासाहेब मगदूम हायस्कूल, प्रगती कॉलेज, राजमाता जिजामाता हायस्कूलही भरायचे. त्याशिवाय स्पर्धा परीक्षेचे क्लासेस अजूनही सुरू आहेत. तालमीची इमारत अजूनही जुन्याच पद्धतीची असली तरी आखाडा आणि अत्याधुनिक व्यायामशाळेत आजही तरुणांची मनगटं मजबूत होत आहेत.
साडेपाच फूट उंचीची कायमस्वरूपी एकाच रूपातील शाडूची मूर्ती हे या तालमीचे वैशिष्ट्य आणि तालमीचा गणपती म्हणजे कोल्हापूरचा मानाचा गणपती.
पर्यावरणपूरक उत्सवाचे आणखी एक पाऊल पुढे टाकत मूर्ती नैसर्गिक रंगांनी रंगवण्याचा नवा पायंडाही या तालमीनेच पाडला. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवी पिढीही आता तालमीच्या माध्यमातून सक्रिय झाली आहे. गेल्या वर्षीचा महापूर असो किंवा यंदाचा कोरोना संसर्ग या काळात ही तरुणाई मदतीसाठी सदैव पुढे होती आणि उत्सवातही विधायकता आणताना अनेक नावीण्यपूर्ण संकल्पनाही हीच मंडळी यशस्वी करत आहेत.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी...
तालमीतर्फे गणेशोत्सवाबरोबरच अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबवले जातात. विविध आरोग्य विषयक शिबिरे, रक्तदान शिबिरांबरोबर आपत्तीच्या काळात गरजूंसाठी तालीम नेहमीच पुढे असते. दत्त जयंती पालखी सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा होतो. उत्सव काळात तर तीनशेहून अधिक कार्यकर्ते झटत असतात. पूर्वी या तालमीच्या मिरवणुकीतील सजीव देखावे पाहण्यासाठी जशी गर्दी असायची तशीच आता देशभरातील लोककलावंतांचा कलाविष्कार पहाण्यासाठी असते. शहरात पहिल्यांदा याच तालमीने मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. म्युझीक लाईट आणली आणि मिरवणुकीला भव्यता आणली.
परिसरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालमीची परंपरा नेटाने आम्ही पुढे नेत आहोत. जे जे समाजाच्या हिताचे ते करण्यावर तालमीने नेहमीच भर दिला आहे. तालमीला गणेशोत्सवाची मोठी परंपरा असली तरी त्यातही आम्ही विधायकता जपली आहे.
- महेश जाधव, अध्यक्ष, तटाकडील तालीम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.