
कोल्हापूर : शाहूनगर दत्त गल्लीतील 21 वर्षीय अजित सूर्यवंशी किराणा दुकानात काम करत वृत्तपत्र विक्रेता म्हणून पहाटे पेपर टाकण्याची जबाबदारीही पेलतो. त्याची आई सुनीता धुण्या-भांडण्याची कामे करून घराला सावरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ब्रेनहॅमरेजमुळे सीपीआरमध्ये त्या आता उपचार घेत आहेत.
त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितलेला खर्च पेलण्याची ताकद अजितची नाही. पैशासाठी हात कुणापुढे पसरायचा?, या विचाराने तो हतबल झाला आहे. घरची स्थिती बेताची स्थिती असल्याने अजितने शाळेला रामराम ठोकून राजारामपुरीत किराणा दुकानात काम स्वीकारले. काही वर्षांपूर्वी त्याने ते काम बंद करून दौलतनगर परिसरात वृत्तपत्र विक्रेता म्हणून कामास सुरवात केली.
आई सुनीता धुण्या-भांड्याची कामे करून घरखर्च पेलतात. मुलगी रेश्मा व ज्योतीचा विवाहाचा खर्च त्यांनी बचतीच्या पैशातून केला. सध्या त्या व अजित दोघे घरी असून, एकमेकांचे आधार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेनहॅमरेजमुळे सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आल्याने अजितच्या पायाखालची वाळू सरकली. पुण्यातील रुग्णालयात शस्त्रक्रियेचा खर्च करण्याची ताकद नसल्याने मित्र-परिवाराने काही रक्कम जमा केली. रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्याला हलविले. रुग्णालयातील डॉक्टर्सनी शस्त्रक्रियेची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यावर पुन्हा त्यांना कोल्हापुरात आणले. इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना ठेवण्याचा खर्च त्याला परवडणारा नाही. त्यामुळे सीपीआरमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता पुन्हा त्याला आईवर शस्त्रक्रिया करावीच लागेल, असे सांगण्यात आले. आईच्या शस्त्रक्रियेसाठी पैसा उभा करण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. कोणापुढे हात पसरायचा, या विचाराने तो त्रस्त आहे.
आईवरील शस्त्रक्रियेचा खर्च दोन लाखांवर सांगितला आहे. इतके पैसे माझ्याकडे नसल्याने काय करावे, हे कळेना झाले आहे. कोणाकडे मदत मागावी, तर तेही शक्य नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया कशी करायची, हाच प्रश्न मला पडला आहे.
- अजित सूर्यवंशी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.