
कोल्हापूर : जुना राजवाडा ते नवा राजवाडा या दरम्यान भाऊसिंगजी रोडवर एका जुन्या मोठ्या उद्यानात टाऊन हॉलची वास्तू आहे. गॉथिक वास्तुशैलीतील ही वास्तू लक्ष वेधणारी आहे. वास्तूइतकंच महत्त्व त्यात असणाऱ्या संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंना आहे. इतिहासाचे महत्त्वपूर्ण पुरावे वारसा म्हणून जपणारी ही वारसा वास्तू आहे.
रॉयल आर्किटेक्चरल इंजिनिअरच्या मेजर मेन्ट यांच्या आराखड्यानुसार पाचशे लोक बसू शकतील, अशा क्षमतेचा हॉल बांधण्यात आला. १८७२ ते १८७६ या काळात ८० हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या वास्तूमध्ये ऑगस्ट १९४७ पासून वस्तुसंग्रहालय सुरू झाले. त्यापूर्वी ३० जानेवारी १९४६ ला सुरू झालेले हे संग्रहालय शुक्रवार पेठेतील जैन मठात होते. गेटमधून दोन्ही बाजूला बगीचा आणि मध्यभागी कारंजाचा मोठा हौद, त्याच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संगमरवरी पुतळा आहे. त्यापुढे देखणा द्वारमंडप आणि प्रशस्त दरवाजा आहे.
आत गेल्यावर मध्यभागी मोठा, उंचावर छत असलेला हॉल, दोन्ही बाजूला सज्जा आणि त्याला दोन्ही बाजूला दोन दोन दालने.
दोन्ही बाजूंना दोन मनोरे आणि मधले छत निमुळते. द्वार मंडपावर गच्ची, त्यामागे एक अरुंद दालन, सभागृहाच्या मागे अर्धगोल दालन आहे. उंच निमुळत्या होत जाणाऱ्या कमानींना विटेच्या बांधकामाची जोड, त्यावर लाकडी तुळ्याची अडक करून पेललेले छत, त्याला आतील बाजूने लाकडी छादन अशी स्थापत्य रचना आहे. १९४५-४६मध्ये ब्रह्मपुरी उत्खननात सापडलेल्या वस्तू, सातवाहन, शालिवाहन, बहामनी, मुगल काळातील वस्तू आणि नाणी,
दुर्मिळ मूर्ती, शस्त्रे, पेंटिंग, विविध इतर दुर्मिळ वस्तू, भांडी, जुने पुतळे, दगडी मूर्ती असा ऐवज संग्रहित केला आहे. त्यांची आकर्षक मांडणी केली आहे. इमारतीच्या दर्शनी भागात पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या कोल्हापूरमधील जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्तंभ उभा केला आहे. इथले उद्यान अनेक दुर्मिळ, परदेशी महत्त्वाच्या वृक्षांनी व्यापलेले आहे. दक्षिण बाजूला तत्कालीन हरित गृह (ग्रीन हाऊस/ ग्लास हाउस) भिडाच्या धातूचे असून, त्या काळात हा प्रयोग झाल्याचे उदाहरण आहे. उत्तरेकडे असाच धातूचा देखणा बॅंड स्टॅंड आहे. इथे काही प्रसंगी कोल्हापूर इन्फंट्रीचे पथक बॅंड वाजवत असे.
मागील बाजूस पश्चिमेला पुन्हा करंजाचा हौद असून, सावलीचा सुंदर अनुभव इथे मिळतो. बागेतील कोपरे, कठडे, पूल, कंपाउंड, पायऱ्या अशा सर्वच ठिकाणी घडीव दगडातील रचना लक्ष वेधून घेते. या बागेच्या देखभालीसाठी दरबारकडून प्रतिवर्षी चार हजार रुपये खर्च केले जात होते. वटवाघळाची एक मोठी वसाहत आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने ही वसाहत आणि इथले दुर्मिळ वृक्षही एक महत्त्वाचा वारसा आहे.
सीतेची आसवे असे फुलांचे झाड, सर्वात लांब पाकळी असणारे फूल, सोनेरी रंगाचे पान, अमृतफळ, भद्राक्ष, तोफ गोळ्याचे झाड, रबराच्या झाडाची मुळे पसरून तयार झालेली एक नैसर्गिक रचना, हे सारं वैशिष्ट्यपूर्ण इथे पहायला मिळते. कारंजाकडे जाताना एका दगडी कोरीव स्तंभाच्या खाली नाजूक कोरीव कामात एक चित्र कथा आहे. टाऊन हॉलचा वापर पुढे संग्रहालयात झाला, त्याची मांडणी सुंदर आहे. बागेला मात्र फारशी शिस्त नाही.
वारसा जतन करण्यासाठी उत्तम ठिकाण
आज त्यातील काही भाग हा समकालीन कलाकारांच्या कलाकृती मर्यादित काळात मांडण्याची संधी म्हणून दिला पाहिजे. बॅंड स्टॅंडला वाद्य वाजवणारे कलाकार, चित्रकार व शिल्पकार यांची प्रात्यक्षिके करण्याचे उपक्रम राबविले पाहिजेत. खऱ्या अर्थानं वारसा जतन करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. मूर्त स्वरूपात असलेली वास्तू आणि तिच्या बरोबर अमूर्त, असा वारसा इथे जपता येईल.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.