कोल्हापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून वेगळा ठसा उमटवलेले नारायण जाधव तथा "एनडी नाना' यांनी आपल्या कारकिर्दीत लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरीला जोडणारा छत्रपती संभाजी महाराज पूल उभारला. त्यावरून बराच वाद झाला; पण "एनडी' यांनी या पुलाच्या खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करून घेऊन आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचे सिद्ध करून दाखवले होते. छत्रपती राजाराम टिंबर मार्केटची उभारणी, रिंग रोड आदी कामांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. शेतकरी कामगार पक्षाचा लढवय्या कार्यकर्ता म्हणून आणि त्याबरोबरच त्यांनी नगरपालिका व पुढे महापालिका सभागृहात केलेल्या उल्लेखनीय कामांच्या स्मृतींना आजही विविध माध्यमांतून उजाळा मिळतो.

देशाचा स्वातंत्र्य लढा असो किंवा गोवा मुक्ती व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये तटाकडील तालीम परिसर अग्रेसर राहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात या परिसरातून सात तुकड्या सहभागी झाल्या होत्या. त्यातील सर्वांत प्रभावशाली काम करणाऱ्या तुकडीचे नेतृत्व "एनडी' यांनीच केले होते. शेतकरी कामगार पक्षाची अनेक आंदोलनेही त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. 1962 ला नगरपालिकेत ते निवडून आले. त्यानंतर कोल्हापूर परिवहन उपक्रम म्हणजेच "केएमटी'चे अध्यक्ष झाले. पुढे 1967 सालीही ते नगरपालिकेत आले आणि 1969 साली नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्षपदाच्या कार्यकालात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यातील छत्रपती राजाराम टिंबर मार्केटची उभारणी आणि छत्रपती संभाजी महाराज पुलाच्या कामाची आजही चर्चा होते. कारण या दोन्ही कामांमध्ये त्यांनी तितक्याच आत्मियतेने लक्ष घातले होते. टिंबर व्यावसायिकांना एकाच ठिकाणी जागा देण्यासाठी वसवलेल्या टिंबर मार्केटच्या कामाची छायाचित्रे आजही जाधव परिवाराने जपून ठेवली आहेत. राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा नगरपालिकेतर्फे झालेला सन्मान असो किंवा छत्रपती संभाजी महाराज पुलाच्या कामाच्या छायाचित्रांचाही त्यामध्ये समावेश आहे.
- बंध सलोख्याचे...
शेतकरी कामगार पक्षाच्या मुशीत घडलेल्या एन. डी. जाधव यांनी सामाजिक सलोख्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्ग्याच्या जीर्णोद्धार कामावेळी काही समाजकंटकांनी बांधकामाचे पायाड पेटवून देऊन दोन समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला; मात्र एका समाजकंटकाला सशस्त्र पकडून त्यांनी पुढील अनर्थ टाळला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर या परिसरातील ब्राह्मण कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठीही त्यांचाच पुढाकार होता.
- फुटबॉलचं वेड
एन. डी. जाधव फुटबॉलचे मोठे चाहते आणि शिवाजी तरुण मंडळाची टीम त्यांची सर्वांत आवडती टीम. त्यांच्या कार्यकालात झालेली फुटबॉल स्पर्धाही आणि बक्षीस म्हणून पाच फुटी चांदीच्या शिल्डची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. फुटबॉल आणि त्याच्या शेजारी फुटबॉल खेळणारे खेळाडू अशी या शिल्डची रचना आहे. ही स्पर्धा महापालिका फुटबॉल संघाने जिंकली आणि हे शिल्ड महापालिकेत आजही असल्याच्या आठवणी ज्येष्ठ मंडळी आवर्जुन सांगतात.
संपादन - यशवंत केसरकर