दुर्गरक्षणासह संवर्धनाचा वसा घेऊ हाती!

special feature of fort in kolhapur district suggest repair in kolhapur
special feature of fort in kolhapur district suggest repair in kolhapur

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यनिर्मितीत गडकोटांनी महत्त्वाची भूमिका निभावली. महाराजांचा प्रत्येक दुर्ग लाखमोलाचा होता. शिवछत्रपतींच्या अतुलनीय पराक्रमाचे साक्षीदार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात तेरा किल्ले उभे आहेत. येथील वास्तू, मंदिरे, विहिरी, तोफा, तोफगोळे यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. मजबूत तटबंदी व बुरुज यांमुळे गडाचे सौंदर्य खुलते ते वेगळेच. मात्र, आज गडांवरील अनेक वास्तूंची दुरवस्था झाल्याचे दिसते. त्यांचे जतन, संवर्धन व संरक्षणासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकण्याची हीच वेळ आहे. दुर्ग संवर्धनाच्या मोहिमेत प्रत्येकानेच सहभागी होणे आवश्‍यकच. चला तर मग, आपणच होऊ दुर्गरक्षक 
आणि करूया साजरी शाश्‍वत शिवजयंती...!

पन्हाळगड : दुसरा स्वतंत्र रस्ता, वास्तु दुरुस्त व्हावी

शिलाहार राजा भोजने बांधलेला किल्ला. मराठ्यांच्या इतिहासात गडाला अनन्यसाधारण महत्त्व. साधोबा दर्गा, पराशरतीर्थ, चार दरवाजा, तीन दरवाजा, अंधारबाव, नायकिणीचा सज्जा, पुसाटी बुरुज, सज्जाकोठी, धर्मकोठी, अंबरखाना या गडावरील अप्रतिम वास्तू आजही त्याच्या वैभवाची साक्ष देतात. 
 

सद्यस्थिती 

  • गडावर येण्यास एकच रस्ता 
  •  ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात वाहनांचा तळ 
  •  नगरपरिषदेकडून सुधारणा, तर पुरातत्त्व 
  •  खात्याकडून अडथळा 
  •  निधीअभावी तटबंदीची कामे रखडली 
  •  पावसाळ्यात वास्तूंची पडझड 

उपाययोजना 

  •  गडाला पर्यायी रस्त्याची आवश्‍यकता 
  •  लाईट अँड साउंड शो होणे गरजेचे 
  •  ऐतिहासिक वास्तूभोवती १०० मीटरपर्यंत 
  •  वाहनांना मनाई करावी
  •  पुरातत्त्व खात्याकडून नगरपरिषदेला सहकार्य   व्हावे 
  •  निधीच्या तरतुदीतून वास्तूंची दुरुस्ती व्हावी 

रांगणा : ढासळलेले बांधकाम मूळ दगडांत करावे

प्रसिद्धगड या नावानेही रांगणा किल्ल्याची ओळख आहे. १७८१ च्या ऐतिहासिक पत्रात ‘एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल,’ असे विधान आढळते. युद्धशास्त्राच्या दृष्टीने प्रवेशद्वाराची रचना आहे. गडावर रांगणाईदेवीची ढाल, तलवार, त्रिशूळ अशी शस्त्रसज्ज मूर्ती आहे.

सद्यस्थिती 

  • फरसबंदीच्या मार्गामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालीत अडथळा 
  • संवर्धन रोप-वे ठिकाणचा बुरुज खिळखिळा 
  • महादरवाजासमोरील बुरुजाचे जुने दगड दरीत, 
  • नव्याने चिऱ्याचे बांधकाम
  • रांगणाई मंदिर बाजूने संरक्षक भिंत व ओवऱ्या 
  • रांगणाईचे जुने मंदिर पर्यटकांचे आकर्षण

उपाययोजना 

  •  गडावरील विहिरी, तलाव, आडातील गाळ काढावा 
  • समाधिस्थळे, इतर बांधकामे चुन्यात पक्की करता येऊ शकतात
  •  चिलखती बुरुजात बुजलेली वाट स्वच्छ करावी 
  •  राजमंदिराचे (राजवाडा) जुने बांधकाम तसेच  ठेवावे
  •  हनुमान दरवाजा व ढासळणारे बुरुज दुरुस्त करावेत

पारगड : तलाव दुरुस्ती, स्वच्छता तातडीने व्हावी

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील नितांत सुंदर किल्ला. हा किल्ला चंदगड तालुक्‍यात येतो. गडाच्या पूर्व पश्‍चिम व उत्तरेला नैसर्गिक ताशीव कड्याची तटबंदी असून, दक्षिणेला खोल दरी आहे. गडाला नैसर्गिक संरक्षण आहे. हा किल्ला तब्बल १८१ वर्षे अजिंक्‍य राहिला. छत्रपती शिवरायांनी हा किल्ला बांधला.

सद्यस्थिती 

  •  गडावर जाण्यासाठी पावणेतीनशे पायऱ्या 
  •  ४८ एकर विस्तीर्ण क्षेत्रफळ 
  •  गडावर शिवकालीन भवानी मंदिर 
  •  छत्रपती शिवरायांच्या सदरेची जागा 
  •  तटबंदीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था 

उपाययोजना 

  •  पायऱ्यांचे बांधकाम करायला हवे 
  •  ढासळणारी तटबंदी दुरुस्त करायला हवी 
  •  गडाचा इतिहास सांगणारे फलक हवेत 
  •  घोडा वाटेचे डांबरीकरण करायला हवे 
  •  तलावांची दुरुस्ती व स्वच्छता करायला हवी 

महिपालगड : तटबंदी, रस्ते बांधकाम व्हावे 

पुरातन मंदिर समूह, प्राचीन गुहा, तट, बुरुज, कातळ कोरीव विहीर, देखणे प्रवेशद्वार गडावर आहे. गड पायथ्याला वैजनाथ महादेव मंदिर आहे. भवानीची काळ्या पाषाणातील मूर्ती अष्टभुजा असून, दत्तात्रयाचे जुने मंदिरही येथे आहे. महादेव मंदिराची बांधणी हेमाडपंती रचनेतील आहे.

सद्यस्थिती 

  •  गडावर बऱ्यापैकी लोकवस्ती
  •  विस्तीर्ण सपाट प्रदेश, सभोवताली घनदाट अरण्य 
  •  बेळगावपर्यंतचा टापू येतो नजरेत
  •  मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण 
  •  तटबंदी ढासळलेली, माहिती फलक नाहीत

उपाययोजना 

  •  गडाची तटबंदी बांधून घ्यायला हवी 
  •  गडाचा इतिहास सांगणारे फलक हवेत 
  •  ढासळणारे बुरुज बांधायला हवेत 
  •  प्रत्येक बुरुजाकडे जाणारा रस्ता तयार करावा
  •  पिण्याचे पाणी व खाद्यपदार्थ पुरवणारे हॉटेल हवे 

गंधर्वगड : इतिहास सांगणारे फलक बसवावेत

चंदगड तालुक्यातील या गडावर हनुमानाची दगडी चौथऱ्यावर मूर्ती आहे. चाळोबा मंदिरही असून, मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. चाळोबाची यात्रा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भरते. मंदिराभोवती गणपती, नागदेवता यांच्या जुन्या काळातील मूर्ती आहेत.

सद्यस्थिती 

  •  शत्रूपासून सुरक्षित गड 
  •  प्राचीन चाळोबा मंदिर 
  •  गडावर लोकवस्ती 
  •  गडावर जाण्यासाठी पक्का रस्ता 
  •  ताशीव बुरुजांचा भाग 

उपाययोजना 

  •  गडाचा इतिहास सांगणारे फलक हवेत 
  •  वाळकुळी फाट्यानजीक दिशादर्शक फलक हवा 
  •  ढासळणाऱ्या बुरुजांची पुनर्बांधणी व्हावी
  •  जुने अवशेष जपायला हवेत 
  •  मंदिराचे प्राचीनत्व जपायला हवे

कलानिधीगड : पक्का रस्ता बांधल्यास गड पाहणे सोपे

गडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून, दोन छोटी मंदिरेही आहेत. गडावर एका चौकोनी कातळ कोरीव हौदात दोन विहिरी आहेत. इथल्या मंदिरासमोर तुळशी वृंदावनासारखी एक जुनी समाधी पाहायला मिळते. गडावर आई भवानी, भैरवाची मूर्ती व शिवलिंग आहे.

सद्यस्थिती 

  • चंदगड तालुक्‍यातील देखणा गड 
  •  माथ्याचा आकार चौकोनी 
  •  प्राचीन अवशेषांचा आढळ 
  •  सभोवती घनदाट जंगल 
  •  विविध प्रकारचे पक्षी व फुलपाखरांचा अधिवास 

उपाययोजना 

  •  पक्‍क्‍या रस्त्यांची आवश्‍यकता
  •  गडावरील ढासळलेले बांधकाम तातडीने करावे
  •  सूचना फलकांची आवश्‍यकता 
  •  पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थांची व्यवस्था करावी
  •  अज्ञात इतिहास उजेडात आणणे आवश्‍यक

मुडागड : इतिहास प्रकाशात आणणे आवश्यक

जंगलात हरवलेला गड म्हणून ओळख. काजिर्डा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली. घनदाट जंगलात हा गड असेल याची कल्पनाच अनेक इतिहासप्रेमींना नाही. गगनबावडा तालुक्‍यात हा गड येतो. गडावर कोणतेही अवशेष नाहीत की पाण्याची व्यवस्थाही नाही.

सद्यस्थिती 

  • कोदे गावातून किल्ल्याकडे जाण्यासाठी पायवाट
  • गडावर तटबंदीचे जांभे दगड आढळतात
  • वाटाड्यांशिवाय गडावर जाणे धोक्‍याचे
  • बिबट्या, गवा, अस्वल, रानडुकरांचा वावर
  • गडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही

उपाययोजना 

  •  गडाचे अस्तित्व नसले तरी त्याचे जतन व्हावे
  •  गडाकडे जाणाऱ्या वाटेवर फलक लावावेत
  •  गड परिसरात पाण्याची व्यवस्था करावी
  •  दुर्गप्रेमींना गडाची ओळख करून द्यावी
  •  स्थानिकांच्या मदतीने गड प्रकाशझोतात आणावा

शिवगड : सफाईसह तटबंदी बांधकाम आवश्यक

दाजीपूरच्या अंतरंगात दडलेला गड म्हणजे शिवगड. निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी व पर्यटकांपासून दुर्लक्षित राहिलेला हा गड. गडाचा आकार आयताकृती असून, त्याच्या चार कोपऱ्यावर चार बुरुज आहेत. गडाच्या दुसऱ्या तटबंदीचा मार्ग पूर्ण केल्यानंतर चौथरा पाहायला मिळतो. 

सद्यस्थिती 

  •  सह्याद्री रांगेपासून वेगळा शिवगडाचा डोंगर
  •  गडावर तटबंदीचे अवशेष
  •  संरक्षणाच्या दृष्टीने दुहेरी तटाची बांधणी
  •  गडावर वन्य श्वापदांचा मुक्त वावर
  •  गडावरून दाजीपूरचे घनदाट जंगल दृष्टिक्षेपात

उपाययोजना 

  •  गडाच्या माहितीचा फलक लावावा
  •  जंगलभेटीत गडावर आवर्जून हजेरी लावावी
  •  गडावरील तटबंदीकडे लक्ष द्यावे
  •  गडाची साफसफाई व्हावी
  •  गडावर पाण्याची व्यवस्था करावी

पावनगड : गडाबद्दल समग्र माहिती प्रकाशित करावी

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. याचे मूळ नाव मार्कंडेय. हिरोजी फर्जंद व अर्जोजी यादव यांनी बांधकाम केल्याबद्दल त्यांना प्रत्येकी पाच हजार होन बक्षीस दिले होते. गडावर तुपाची विहीर, राजवाड्याचे अवशेष आहेत. गडावर ४०६ दगडी तोफगोळे सापडले. 

सद्यस्थिती 

  •  गडावर पर्यटकांचा वावर कमी
  •  गडाच्या इतिहासापासून पर्यटक अनभिज्ञ
  •  गडावर ऐतिहासिक अवशेषांचा आजही आढळ
  •  उत्कृष्ट तटबंदी हे गडाचे वैशिष्ट्य
  •  महादेव मंदिराचे गडावर अस्तित्व

उपाययोजना 

  •  गडाचे योग्य संवर्धन व्हावे
  •  पर्यटकांना गडाबद्दल माहिती द्यावी
  •  वास्तूंचे जतन चांगल्या तऱ्हेने व्हावे
  •  मद्यपींना गडावर जाण्यापासून रोखावे
  •  प्रेमी युगुलांना गडावर जाण्यापासून रोखावे

विशाळगड : वास्तूंसह पायऱ्या दुरुस्ती व्हावी

विशाळगड अर्थात खेळणा म्हणजे मूर्तिमंत कष्ट व संकटे, तो घेण्याची कल्पना जरी केली तरी प्राण कासावीस होतात, असे इतिहासकार साकी मुस्तेखानाची नोंद सापडते. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून याच गडावर सहीसलामत पोचले. शत्रूला जिंकण्यास हा कठीण किल्ला. 

सद्यस्थिती 

  •   गडावरील पायऱ्या नादुरुस्त 
  •   गडावर अपुरा पाणीपुरवठा 
  •   गडावरील वास्तूंची पडझड 
  •   सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह नाही
  •   वीजपुरवठा वारंवार खंडित 

उपाययोजना 

  • वास्तूंची डागडुजी करावी
  • सौर ऊर्जा टॉवर बसवावेत 
  • गडासाठी स्वतंत्र नळ-पाणी पुरवठा योजना व्हावी 
  • पायऱ्यांची डागडुजी व्हावी 
  • रोप-वे करण्याचा विचार व्हावा 

सामानगड : ऐतिहासिक अवशेष शोधावेत

गडाच्या सर्व बाजूंनी तासलेला कातळ असून त्यावर सुमारे पंधरा फूट उंचीची तटबंदी. जागोजागी बुरुज आहेत. गडदेवता अंबाबाईचे छोटेखानी कौलारू मंदिर आहे. अष्टभुजा देवीच्या हातातील परशू, बाण, तलवार, त्रिशूल, ढाल व भाला ही आयुधे येथे पाहायला मिळतात. पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत.

सद्यस्थिती 

  • पर्यटनाच्या अनुषंगाने आवश्‍यक कामे अपूर्ण 
  •  रस्ते विकासामुळे जुने अवशेष भरावात
  •  रेस्ट हाऊस व बगीचाकडे दुर्लक्ष 
  •  ऐतिहासिक ठिकाणांच्या दुरुस्तीची गरज 
  •  दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे सामानगडाच्या पूर्वाभिमुख  दरवाजाचा शोध 

उपाययोजना 

  •  गडावरील निलगिरी व अकेशियाची झाडे तोडून वृक्षारोपण व्हावे 
  •  गडाच्या सुरक्षिततेसाठी गांभीर्य हवे 
  •  विकासासाठी शासनाकडून निधीची आवश्‍यकता 
  •  इतिहासकालीन अवशेष शोधावेत
  •  पिण्याचे पाणी, उपाहारगृह आणि वाहनतळ व्हावे

भुदरगड : तटबंदी बुरुज दुरुस्ती तातडीने व्हावी

भैरवनाथ देवस्थानामुळे भुदरगड पंचक्रोशीत प्रसिद्ध. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ७९८ मीटर आहे. गड पायथ्याला शिवापूर हे निसर्गरम्य गाव आहे. गडावर जुन्या बांधणीचे महादेवाचे मंदिर असून, गर्भगृहात शिवलिंग व सुबक कोरीवकाम केलेला नंदी आहे.

सद्यस्थिती 

  •  वृक्षलागवड मोहीम सुरू होऊन रेंगाळली
  •  भैरवनाथ मंदिरासमोरील भक्त निवासाची  दुरवस्था
  •  भुयारी जखूबाई मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत
  •  पुरातन मंदिरे शोधावी लागतात
  •  अनेक ठिकाणी तटबंदीला धक्का

उपाययोजना 

  • ढासळलेली तटबंदी, बुरुज बांधकाम आवश्‍यक
  • दुधी तलावाच्या काठी स्थलांतरित प्रवासी पक्षी पाहण्याची व्यवस्था करावी
  • भक्त निवास, जखूबाई मंदिर दुरुस्ती गरजेची
  • किल्ल्याजवळ वनहद्दीत वन्यप्राण्यांसाठी वनतळी बांधावीत
  • जंगल क्षेत्रातील औषधी वनस्पती जपाव्यात

गगनगड : हायमास्ट विजेसह रोप-वे व्हावा

करुळ व भुईबावडा घाटामधील मध्यबिंदू म्हणजे गगनगड. पर्यटकांच्या हमखास विसाव्याचे ठिकाण. गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. गगनगिरी महाराजांचा मठ गडावर आहे. गडाची निर्मिती भोज राजाच्या काळात झाली असून, गडाच्या डोंगराच्या पहिल्या टप्प्याच्या परिसरात मठाचे कार्यालय, भोजनगृह, भव्य भक्तनिवास आहे.

सद्यस्थिती 

  • गडावर गगनगिरी महाराजांचे मंदिर 
  • गडाच्या दुसऱ्या टप्प्यावर पायऱ्या
  • मोठमोठ्या इमारतींमुळे गजबजलेला परिसर
  • गगनगिरी महाराजांवरून गगनगड हे नाव पडल्याचा अंदाज
  • गडावर प्रवेश करताच डाव्या बाजूस लेणी

उपाययोजना 

  • गगनबावडा ते गगनगड रोप-वे आवश्‍यक
  •  गगनबावडा ते गगनगड हायमास्ट वीज आवश्‍यक
  •  पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाईड आवश्‍यक
  •  गगनगडाची माहिती पुस्तिका प्रसिद्ध करावी
  •  शाळा-महाविद्यालयांच्या भेटी घडवाव्यात

चला, शपथ घेऊया...

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील गड-किल्ले,
आमचे प्रेरणास्थान आहेत!
      सह्याद्रीच्या कुशीतील या गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन,
      हे आमचे परमकर्तव्य आहे! 
मराठा साम्राज्याच्या शौर्याच्या 
या पाऊलखुणा, मी जीवापाड जपेन!
      त्यासाठी मी, माझा परिवार आणि मित्रमंडळी, 
       सदैव कटिबद्ध राहीन!

संकलन : संदीप खांडेकर, आनंद जगताप, सुनील कोंडुसकर, धनाजी आरडे, शाम पाटील, पंडीत सावंत, अवधूत पाटील
 

छायाचित्र : मोहन मेस्त्री 


मांडणी : दिलीपसिंह यादव

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com