ना...आदेश...ना...सूचना तरीही गावागावांतून स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन

अशोक पाटील
गुरुवार, 9 जुलै 2020

चंदगड तालुक्‍यात स्थानिक संसर्गाची लागण झाल्याने भीतीपोटी नागरिक स्वतःहून गावे बंद करीत आहेत. बाजारपेठा बंद केल्या जात आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले जात आहेत. सरपंच संघटनेने तर तालुक्‍यात लॉकडाउन करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे.

कोवाड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाउन सुरू करण्यात आला. काही दिवसांनी लोक हळूहळू घराबाहेर पडू लागले. त्यामुळे शासनाने लॉकडाउनमध्ये काही अंशी शिथिलता आणली. आता मात्र कोरोनाचा स्थानिक संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाचा आदेश नसतानाही चंदगड तालुक्‍यातील गावागावांतून उत्स्फूर्तपणे बंद पाळला जात आहे. 

तालुक्‍यात स्थानिक संसर्गाची लागण झाल्याने भीतीपोटी नागरिक स्वतःहून गावे बंद करीत आहेत. बाजारपेठा बंद केल्या जात आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले जात आहेत. सरपंच संघटनेने तर तालुक्‍यात लॉकडाउन करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, अशा सूचना आता घराघरांत दिल्या जात आहेत. 

तालुक्‍यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. पण, बऱ्या झालेल्या रुग्णांचेही प्रमाण समाधानकारक आहे. आठ दिवसांपासून तालुक्‍यात स्थानिक रुग्ण सापडल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेगाने वाढणारी रुग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे. प्रशासन व आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण पुणे, मुंबई व बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांचा ओघ सुरूच आहे. तसेच, होम क्वारंटाईनवर भर दिला जात असल्याने लोकांची धाकधूक वाढली आहे.

आठ दिवसांपासून स्थानिक संसर्गाची सुरवात झाल्याने गावागावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यायला सुरवात केली आहे. गावे बंद केली जात आहेत. कोवाड, अडकूर, चंदगड, तुर्केवाडी, माणगाव व कुदनूर या बाजारपेठाही नागरिकांनी स्वतःहून बंद केल्या आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध घातले आहेत. एक वेळ लॉकडाउन शिथील होऊ दे म्हणणारे लोक आता उत्स्फूर्तपणे स्वतःच गावं बंद करून लॉकडाउन करीत आहेत. 

साखळी तोडण्यासाठी कोवाड बंद
चंदगड तालुक्‍यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. तसेच, स्थानिक संसर्ग होऊ लागल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. तालुक्‍यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आम्ही कोवाड बाजारपेठ बंद ठेवली आहे. 
- दयानंद सलाम, अध्यक्ष, व्यापारी संघटना, कोवाड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spontaneous Lockdown In Chandgad Taluka Kolhapur Marathi News