धक्कदायक : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 50 टक्केच पगार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

अपेक्षीत महसुल नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना जूनचे वेतन 50 टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर :  कोरोना लॉकडाऊनमुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद राहिली. एसटी महामंडळाला जेमतेम प्रवासी लाभला. त्यामुळे अपेक्षीत महसुल नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना जूनचे वेतन 50 टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील जवळपास एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचे जूनचे वेतन 50 टक्के देण्याबाबत परिपत्रक एसटीच्या मुख्यालयाकडून विभाग नियंत्रकांना पाठवले आहे. पुढील महिन्यांच्या वेतना विषयी स्पष्ट आदेश नाहीत. वीस दिवसापूर्वी जिल्ह्यांर्तगत प्रवासी सेवा सुरू केली मात्र त्याला प्रवासी प्रतिसाद नाही. 

एसटीचा दोनशे कोटींचा महसुल बुडाला आहे. तरीही अत्यावश्‍यक सेवेसाठी तसेच परप्रांतीय कामगारांची वाहतुक करण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. एसटी महामंडळाळाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलती पोटीची 270 कोटी रूपये राज्य शासनाने एसटी महामंडळाला दिले आहेत. त्या रक्कमेतून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याला ही खीळ बसली आहे. 

धोका पत्करून एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यावश्‍यक सेवेसाठी गाड्या चालविल्या. राज्य शासनाने सवलत मुल्याचे 270 कोटी रूपये एसटीला दिले. तरीही 50 टक्के वेतन कपात केल्याने कर्मचाऱ्यात असंतोष आहे. कोरोना काळात कर्मचाऱ्यांवर अर्थिक संकट ओढावणार आहे. 
- संदीप शिंदे, राज्याध्यक्ष, राज्य एसटी कर्मचारी मान्यता प्राप्त संघटना. 

दृष्टिक्षेप 
- लॉकडाऊनमुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद 
- लॉकडाउन शिथील नंतरही जेमतेमच प्रवासी 
- एसटीचा दोनशे कोटींचा महसुल बुडाला 
- एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना अर्थिक अडचणींचा सामना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST employees will get only 50 percent salary