राज्य सरोवर संवर्धन योजना कुचकामी ; 18 प्रस्ताव दाखल; चार प्रकल्पांना केवळ 1 कोटी 

सदानंद पाटील
Thursday, 7 January 2021

राज्य शासनानेही राज्य स्तरावर सरोवर संवर्धन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत मागील पाच वर्षात जिल्ह्यातून तब्बल 18 प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र यातील केवळ 4 तलावांच्या संवर्धनाला मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाली असली तरी निधीमात्र तुटपुंजा मिळत असल्याने ही योजना कुचकामी ठरली आहे. 

कोल्हापूर  : पर्यावर संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यांचे जतन करण्यासाठी केंद्र शासनाने सरोवर संवर्धन योजना आणली. या योजनेंतर्गत राज्यातील तलावांचाही समावेश केला मात्र केंद्र शासनाच्या योजनेच्या मर्यादा व राज्यातून येणारे प्रस्ताव यांचा मेळ जमत नसल्याने राज्य शासनानेही राज्य स्तरावर सरोवर संवर्धन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत मागील पाच वर्षात जिल्ह्यातून तब्बल 18 प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र यातील केवळ 4 तलावांच्या संवर्धनाला मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळाली असली तरी निधीमात्र तुटपुंजा मिळत असल्याने ही योजना कुचकामी ठरली. 
जिल्ह्यात शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या या तलावातून अनेक गावांना पाणीपुरवठा होत असे. हातकणंगले तालुक्‍यातील अतिग्रे येथेही शाहूकालीन एक तलाव आहे. काही तलावांची निर्मिती ही 1972 साली पडलेल्या दुष्काळात केली आहे. अनेक गावात हे तलाव आता कचरा संकलनाचे केंद्र बनले आहेत. जिल्ह्यातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाकडे 18 प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र चार प्रस्ताव वगळता उर्वरित धूळ खात पडले आहेत. तसेच जे चार प्रकल्प मंजूर झाले आहेत त्यांची किंमत 12 कोटी असून निधी मात्र 1 कोटी रुपये दिला आहे. 

मंजुरी कोटीत, उपलब्ध लाखात 
पुलाची शिरोली गावासाठी तत्कालीन आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून 3 कोटी 49 लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. तर प्रत्यक्ष कामासाठी 25 लाख उपलब्ध आहेत. वडणगे (ता. करवीर) तलावासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून 3 कोटी 70 लाख रुपये मंजूर झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात 60 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. केर्ली तलावासाठी 1 कोटी 24 लाखांचा आराखडा मंजूर असून 20 लाख रुपये उपलब्ध आहेत. जोतिबा देवस्थान वाडीरत्नागिरी तलावासाठी 2 कोटी 38 लाख मंजूर आहेत. 

राज्य शासनाकडे आलेले प्रस्ताव 
पोर्ले तर्फ ठाणे, बहिरेवाडी, (ता. पन्हाळा ), अतिग्रे, (ता. हातकणंगले ), कोनवडे, (ता. भुदरगड), अर्जुनवाडा, ठिकपुर्ली, (ता. राधानगरी), कुंभोज, (ता. हातकणंगले), निगवे, गडमुडशिंगी, शिरोली दुमाला (ता. करवीर), म्हाळुंगे, वाकरे, (ता. करवीर), टाकवडे, ता. शिरोळ, अंबप, (ता. हातकणंगले). 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Lake Conservation Scheme ineffective; 18 proposals filed; Only 1 crore to four projects