कोल्हापूर जिल्ह्यात या ठिकाणी मिळतात गुढी उभा करायच्या काठ्या...

पंडित सावंत
Friday, 20 March 2020

गुढीपाडवा सणासाठी आवश्‍यक असणारी चिवाकाठी उपलब्ध करण्यासाठी गगनबावड्यातील चिवा व्यावसायिक शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

कोल्हापूर - गुढीपाडवा सणासाठी आवश्‍यक असणारी चिवाकाठी उपलब्ध करण्यासाठी गगनबावड्यातील चिवा व्यावसायिक शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. गुढीपाडवा या हिंदू नववर्षाचे स्वागत दारोदारी उंच गुढी उभारून केले जाते. यंदा गुढीपाडव्याचा सण बुधवारी (ता. २५) असून, तो आठवड्यावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यातील अन्य भागात गुढीसाठी लागणाऱ्या चिवाकाठीची मोठ्या प्रमाणात टंचाई असली, तरी गगनबावडा तालुक्‍यात मात्र ही चिवाकाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

नदीकाठाच्या जमिनीत पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याबरोबर चिखलमाती साचून रहावी, शेतीचा बांध घसरू नये, नदीकाठची जमीन तुटून जाऊ नये, यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पूर्वी चिव्याची लागवड करायचे. माळरानात, जंगलात असणाऱ्या चिव्यांना वणवा, आग लागू नये यासाठी दक्षता घ्यायचे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिवा उपलब्ध व्हायचा. शेताशेजारील चिवा व त्याची बेटे शेतातील पिकाला मारक ठरत असल्याने अलिकडच्या काही वर्षात चिव्यांची कवडीमोल दराने विक्री करून शेतकऱ्यांनी शेती रिकामी करून घेतली आहे. पर्यायाने गुढीपाडव्यासाठी अगदी सहज व फुकटात उपलब्ध होणारी चिव्याची काठी ग्रामीण भागातही विकत घेण्याची वेळ आली आहे.

वाचा - घडलं ते थरारकच... जीवावर आलेलं कानावर निभावलं...

चिव्यांच्या विक्रीस शहरात व उपनगरांमध्ये बाजारपेठ उपलब्ध असली तरी गगनबावड्यासारख्या ग्रामीण भागात कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नाही. पर्यायाने तालुक्‍यातील चिवा व्यावसायिक शेतकरी चिव्यांची उपलब्धता करून बाजारपेठेत विक्री करण्यासाठी गुढीपाडवा सणाच्या अगोदर धडपडत असतात. चिव्यांची उपलब्धता करण्यात लोक व्यस्त असल्याचे चित्र गगनबावडा तालुक्‍यात अनेक ठिकाणी दिसत आहे.

हक्‍काची बाजारपेठ आवश्‍यक

गगनबावड्यातील चिवाकाठी कवडीमोल दराने खरेदी करून कोल्हापूर येथील व्यावसायिक तिची विक्री करतात. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना पुरविणारे अनेक व्यापारी गगनबावड्यासारख्या ग्रामीण भागात तयार झाले आहेत. अशा व्यापाऱ्यांकडून सुटका मिळण्यासाठी व वाहतूक खर्च टाळून चिवाकाठीला चांगला दर मिळण्यासाठी गगनबावडा तालुक्‍यातच चिवाकाठी विक्रीसाठी हक्‍काची बाजारपेठ असणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stick for gudi padwa available in gaganbawada