घडलं ते थरारकच... जीवावर आलेलं कानावर निभावलं...

रमजान कराडे
शुक्रवार, 20 मार्च 2020

दुपारची वेळ. गावात शांतता. अशावेळी गावच्या उत्तरेकडून आलेल्या त्याच्या आगमनाची बातमी क्षणार्धात गावभर पसरल्याने जो तो त्याला पाहण्यासाठी धाव घेऊ लागला.

कोल्हापूर - दुपारची वेळ. गावात शांतता. अशावेळी गावच्या उत्तरेकडून आलेल्या त्याच्या आगमनाची बातमी क्षणार्धात गावभर पसरल्याने जो तो त्याला पाहण्यासाठी धाव घेऊ लागला. मात्र, शांतपणे गल्लीबोळातून फिरत असताना काही अतिउत्साही तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे बिथरल्याने त्याने पळ काढला. मात्र, पळत असताना वाटेत आलेल्या व्यक्तीला दिलेल्या जोराच्या धडकेने व्यक्तीचा कान फाटला गेला. 
त्याच्या हल्यात वाचलेल्या व्यक्तीच्या जीवावर आले होते. मात्र, कानावर निभावले. अशावेळी नागरिकांचा नडलेला अतिउत्साहीपणा, शांततेचे आवाहन करताना स्वतः शांत झालेला वनविभाग अन्‌ त्याच्या आगमनाची झालेली चर्चाच 
अधिक रंगली. 

बुधवारी (ता. १८) भरदुपारी बस्तवडे, कौलगेमार्गे नानीबाई चिखलीत आलेला गवा. त्याच्यामुळे गावात घडलेला पाच ते सहा तासांचा थरार. या थरारामध्ये केवळ दैव बलवत्तर म्हणूनच कृष्णात पोवार वाचले. मात्र, यामुळे नागरी वस्तीत गव्यांच्या वारंवार येण्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. गेल्या महिन्याभरात याच गव्यांचा कळप पाच ते सहा गावांतील गावकऱ्यांच्या नजरेस पडला होता. यामुळे आता वेदगंगा, चिकोत्रा नदीकाठावरील शेतकरी, महिलावर्ग भयभीत 
झाले आहेत. 

दुपारच्या वेळेस गवा आल्याने एकच खळबळ माजली. त्याला पाहण्यासाठी लहानांपासून वृद्धापर्यंत अनेकांनी धाव घेतली. मात्र, त्याला सामोरे कसे जायचे याची योग्य माहिती नसल्याने हुल्लडबाजी तरुणांकडून त्याच्या दिशेने दगड मारणे, फटाके वाजवण्याचे प्रकार घडले. यातून बिथरलेल्या गव्याने दोघांना जखमी केले. जखमी झालेल्या कृष्णात पोवार यांचा गव्याच्या धडकेत कान फाटला. कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात त्यांच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना अजूनही काही आठवत नाही. 
पाच-सहा तासांच्या कालावधीत दमलेल्या गवा रेड्याने शिवाजी आंबी यांच्या ज्वारीच्या पिकात ठाण मांडले होते. यावेळी त्याला इंजेक्‍शन देऊन बेशुद्ध करावे व घेऊन जावे, असा ग्रामस्थांचा आग्रह होता. मात्र, तसे करता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे. यामुळे ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांत तणावाचे प्रसंग देखील उद्‌भवले. अशावेळी सर्वांनीच शांत राहत एकमेकांना सहकार्य करने गरजेचे होते. मात्र तसे घडले नाही. 

गवे पाण्याच्‍या शोधात मानवी वस्‍तीकडे

गव्यांचे आदिवासाचे ठिकाण म्हणून दाजीपूर अभयारण्याकडे पाहिले जाते. मात्र, अभयारण्यात वाढलेला मनुष्याचा वावर, प्राण्यांची होत असलेली शिकार, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, जंगलातील वणवे, जानेवारी महिन्यानंतर होणारी चाऱ्याची, पाण्याची टंचाई, यामुळे प्राणी मानवी वस्तीकडे वळताना दिसत आहेत. 

चाऱ्याची, पाण्याची कमतरता जाणवल्याने गव्यांचा वावर नागरी वस्तीकडे वाढला आहे. त्यांना सामोरे जाताना ग्रामस्थांनी आततायिपणा करू नये. ते एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबत नाहीत. वन्यप्राणी जगले पाहिजेत, तसेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. 
- बळवंत शिंदे, वन अधिकारी, सेनापती कापशी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gaur entry in nanabaichikhli village kolhapur