‘एसटीपी’ पंप हाउस होणार सक्षम ; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरी

पंडित कोंडेकर
Sunday, 25 October 2020

टाकवडे वेसमधील प्रकल्प; दोन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव  

इचलकरंजी : येथील टाकवडे वेस परिसरातील एसटीपी प्रकल्पाच्या पंप हाउसमधील जुनी मशिनरी बदलण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव असून, त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली. आता निधीसाठी शासन पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. 
शहरातून दररोज सुमारे २६ एमएलडी इतके मैलायुक्त सांडपाणी तयार होत असते. हे सर्व सांडपाणी ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून टाकवडे वेस येथील पंप हाऊस येथे जमा होते. तेथे प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर तेथून सांडपाणी आसरानगर येथील मलशुद्धीकरण (एसटीपी) प्रकल्पात पाठविले जाते. मात्र, या पंप हाउसमधील मशिनरी २२ वर्षांपूर्वी बसवली आहे. यातील बहुतांश मशिनरी खराब झाली आहे. 

सात ते १० वर्षांनंतर तेथील साधन सामुग्री बदलणे आवश्‍यक असते; पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे. येथे असणारी मशिनरी सातत्याने बंद पडत असते. त्यामुळे मैलायुक्त सांडपाणी बाहेर पडून ते काळ्या ओढ्याद्वारे थेट पंचगंगा नदीपात्रात मिसळत असते. याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतात. याप्रश्‍नी प्रदूषण नियंत्रण मंडळानेही अनेकवेळा पालिकेला खडसावले आहे.

हेही वाचा- सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी :  गुरुजींची अपार माया अन् त्यांच्याच साडीने सजते माहेरवासीनीची काया -

प्रसंगी कारवाईही केली आहे. मात्र हा प्रश्‍न सुटलेला नाही. यासाठी या उपसा केंद्रातील जुनी मशिनरी बदलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रस्ताव तयार केला आहे. त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. निव्वळ खर्च एक कोटी ९४ लाख ५९ हजार ५०९, तर ढोबळ खर्च दोन कोटी ४७ हजार १८६ रुपये खर्चाचा हा प्रस्ताव आहे. याबाबत निधी उभा करण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: STP pump house will be enabled in ichalkaranji