
महापालिकेचे राजकारण अनेक वर्षे ताराराणी आघाडीने एकतर्फी चालविले. १९९० पासून ते २०१०पर्यंत तीन दशके या आघाडीकडे कारभार होता.
कोल्हापूर : महापालिकेचे राजकारणात दबदबा असणारी ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ताराराणी आघाडी भाजपमध्ये विलीन होणार का?असा एक प्रश्न उपस्थित केला जात होता; पण जेथे भाजपची व्होट बॅंक नाही, अशा विभागात राजकीय सोयीसाठी ताराराणी आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याची व्यूहरचना आहे. दोन्ही काँग्रेसची महापालिकेतील सत्ता घालविण्यासाठी भाजपच्या मदतीने ताराराणी आघाडी या निवडणुकीत फिल्डिंग लावणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागाचा अंदाज घेऊन रणनीती आखली जात आहे.
महापालिकेचे राजकारण अनेक वर्षे ताराराणी आघाडीने एकतर्फी चालविले. १९९० पासून ते २०१०पर्यंत तीन दशके या आघाडीकडे कारभार होता. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा शब्द म्हणजेच महापालिकेचे राजकारण असे एक समीकरण बनले होते. त्या काळात पक्षाऐवजी अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून आणले जात होते. २००९ नंतर महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात राजकीय संघर्ष निर्माण झाल्यानंतर महाडिक विरोधकांनी महापालिकेच्या राजकारणाला पक्षीय चेहरा देण्याचे ठरविले आणि महापालिकेच्या राजकारणात राजकीय पक्षांचा शिरकाव झाला. तत्पूर्वी भाजप आणि शिवसेना वगळता कोणीच पक्षीय राजकारण करत नव्हते.२०१० नंतर काँग्रेसचे नेतृत्व सतेज पाटील यांच्याकडे एकहाती आले, तर राष्ट्रवादीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व होते. या दोघांनी महापालिकेवर दोन्ही काँग्रेसची सत्ता आणली. २०१० ते २०१५ या काळात ताराराणी आघाडीची काहीशी पीछेहाट झाली.
पण २०१५ च्या निवडणुकीत मात्र भाजपशी युती केलेल्या ताराराणी आघाडीचे १९ नगरसेवक निवडून आले. क्रमांक दोनचा पक्ष म्हणून ताराराणीने स्थान मिळविले. सतेज पाटील यांच्याशी संघर्षात या आघाडीचे नगरसेवक नेहमीच आघाडीवर असत. ताराराणीचे अध्यक्ष म्हणून आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र स्वरुप महाडिक यांचे नाव असले तरी प्रत्यक्षात या आघाडीचे नेतृत्व माजी आमदार महाडिक आणि माजी खासदार धनंजय महाडिक हेच करतात. २०२० ही निवडणूक तर ताराराणी आघाडीच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करून सत्ताबदल करण्याचा प्रयत्न या आघाडीचा राहील. आघाडीच्या राजकीय जोडण्यांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजपची व्होट बॅंक नसलेल्या ठिकाणी ताराराणी आघाडीचे चेहरे निवडून आणून बहुमताचा आकडा गाठण्याचा या आघाडीचा प्रयत्न राहणार आहे.
हे पण वाचा - मंत्र्यांप्रमाणे जनतेचीही वीज बिले माफ करा नाहीतर जनता तुम्हाला शॉक दिल्याशिवाय राहणार नाही
मागील सभागृहात...
ताराराणी आघाडीचे नगरसेवक : १९
विरोधी पक्षनेतेपदी विलास वासकर, किरण शिराळे यांनी केले काम
संपादन - धनाजी सुर्वे