सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास होणार कडक कारवाई 

महेश काशीद 
Friday, 14 August 2020

हिंसाचाराची घटना घडून जातीय तेढ निर्माण झाले.

बेळगाव  - बेळगावसह राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरील अफवांमुळे तणाव निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी किमान दोन वेळा विचार करण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केलेल्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाते आहे, अशी माहितीही पोलिस आयुक्‍तांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 

दोन दिवसांपूर्वी बंगळूरमध्ये अफवांचे पीक वाढून त्यातून तणाव निर्माण झाला. त्यामुळे हिंसाचाराची घटना घडून जातीय तेढ निर्माण झाले. अलिकडेच याप्रकारची घटना बेळगावातही घडली आहे. डॉक्‍टरांनी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याची अफवा निर्माण होऊन रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका पेटविली. यातून सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची हानी केली. मणगुत्ती येथील घटनेत काहींनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर त्या इतरांनी शेअर केल्या. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील वातावरण तणावमय झाले. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात गंभीर पाऊल उचलण्याबाबत इशारा दिला आहे. 

पोलिस आयुक्तांतर्फे यासंदर्भात जारी पत्रकात, सोशल मीडियावर वादग्रस्त तसेच आक्षेपार्ह पोस्ट न करण्याचे आवाहन केले आहे. कोणाची भावना किंवा जातीय तेढ वाढणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी किमान दोन वेळा विचार केला जावा.

हे पण वाचा - Video - ब्रेकिंग - महिलांनी फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना काळं फासून काढली धिंड

 

एखाद्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे कोण पोस्ट करतात, त्यांना जबाबदार धरले जाते. तसेच आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यासह वादग्रस्त अभिप्राय नोंदवणाऱ्या व्यक्तीलाही जबाबदार धरले जाते. यामुळे प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict action will be taken if offensive posts are posted on social media