कोल्हापुरात संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी

 Strict enforcement of curfew in Kolhapur
Strict enforcement of curfew in Kolhapur
Updated on

कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरामध्ये जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीची आज कडेकोट अंमलबजावणी करण्यात आली. खाऊ गल्ल्या, मध्यवर्ती बसस्थानकाजवळील खाद्यपदार्थांच्या गाड्या लवकर बंद झाल्या. सर्व हॉटेल, बार, वाईन शॉप नेहमीपेक्षा लवकर बंद झाले. संचारबंदीमुळे रात्री अकरानंतर संपूर्ण शहरात शुकशुकाट होता. वर्षअखेर आणि नाताळ यामुळे हॉटेलमध्ये किंवा शहरातील काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व शहरांमध्ये रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. याची कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलिसांनी संचलन करून नागरिकांचे प्रबोधन केले. त्यानंतर शहरातील सर्व खाऊ गल्ल्या, हॉटेल बंद करण्यात आले. पेट्रोल पंपावरही शुकशुकाट होता. मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात रात्री प्रवासी, रिक्षा यांची गर्दी असते; पण संचारबंदीमुळे या परिसरातही शांतताच होती. चौकाचौकात पोलिस बंदोबस्त होता. रस्त्यावरून फिरणाऱ्यांना हटकले जात होते. नागरिकांनीही घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य केले. 

प्रवाशांचे हाल 
परगावहून कोल्हापुरात आलेल्या प्रवाशांना रात्री उशिरा जेवण मिळाले नाही. तसेच लॉज बंद राहिल्याने राहण्याचीही अडचण झाली. काहींना मध्यवर्ती बसस्थानकातच रात्र काढावी लागली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. 

हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान 
लॉकडाउनमुळे सुमारे आठ ते दहा महिने हॉटेल बंद होती. त्यानंतर आता कुठे त्यांचा व्यवसाय सुरू झाला होता. नाताळ आणि वर्षअखेर यामुळे त्यांना व्यवसायाची संधी होती; मात्र संचारबंदी लागू झाल्याने त्यांचे नुकसान झाले. 

पोलिसांचे संचलन
पोलिसांनी शहरात आज रात्री संचलन केले. संचारबंदीचे काटेकोर पालन करा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. शहराच्या प्रमुख मार्गावरून झालेल्या संचलनापूर्वी शहरातील व्यवहार बंद झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 
शहर परिसरात रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची काटेकोर अंमलबाजवणी व्हावी, याबाबत आज सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार रात्री दहाच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयापासून पोलिसांनी संचलन केले. यात सुमारे 150 हून अधिक पोलिस कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी सहभागी झाले होते. हे संचलन दसरा चौकात आले. त्यानंतर तीन तुकड्यांत त्याचे विभाजन झाले. या तुकड्यांनी शहर परिसरातील बिंदू चौक, मध्यवर्ती बसस्थानक, ताराराणी चौक, गंगावेश, महापालिका चौक, महाद्वार रोड आदी भागांत संचलन केले. अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार संचारबंदी वेळेत बंद ठेवा, अन्यथा लॉकडाउनप्रमाणे कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या संचलनाचे नेतृत्व शहर पोलिस उपअधीक्षक महेश चव्हाण यांनी केले. यात जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, लक्ष्मीपुरीचे अनिल गुजर, राजारामपुरीचे सीताराम डुबल, शाहूपुरीचे श्रीकृष्ण कटकधोंड, शहर वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी आदी अधिकारी सहभागी झाले होते.

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com